मुंबई- दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या एका वृद्ध महिलेला तिच्या नातवानेच कचऱ्यात टाकल्याची घटना गोरेगावच्या आरे परिसरात घडली आहे. वृद्धेला त्वचेचा कर्करोग असून अंगावर ठिकठिकाणी जखमा झाल्या आहेत. त्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यासाठी आरे पोलिसांना ९ तास वणवण फिरावे लागले होते. सध्या कूपर रुग्णालयात महिलेवर उपचार सुरू आहेत.
गोरेगावच्या आरे येथील युनिट ३२ च्या रस्त्यावरील कचऱ्यात एक वृध्द महिला असल्याची माहिती शनिवारी सकाळी ८ च्या सुमारास आरे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार आरे पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता ६० वर्षांची वृद्धा कचऱ्याच्या ढिगाऱ्यात विव्हळत पडल्याचे आढळले. तिच्या शरीरावर असंख्य जखमा होत्या आणि तिला त्वचेचा दुर्धर आजार झाला होता. माझ नातू मला इथे सकाळी टाकून निघून गेला एवढीच माहिती ती देऊ शकली. तिला आपला पत्ताही नीट सांगता आला नाही.
पोलिसांनाही रुग्णालयांचा नकार…
रुग्णालये दाखल करून घेण्यास अनेकदा नकार देतात, तेव्हा सामान्य नागरिक पोलिसांकडे धाव घेतात. मात्र, या महिलेला दाखल करण्यासाठी पोलिसांनाही रुग्णालयांच्या हातापाया पडण्याची वेळ आली. आरे पोलिसांच्या पथकाने या महिलेला सुरवातीला जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात नेले. मात्र रुग्णालयाने दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यानंतर कूपर रुग्णालयानेही सुरवातील वेगवेगळी कारणे देत नकार दिला. दिवसभर पोलीस या वृध्द महिलेला रुग्णालयात दाखल करण्यासाठी वणवण फिरत होते. शेवटी खूप विनवणी केल्यानंतर संध्याकाळी साडेपाच वाजता कूपर रुग्णालयाने या वृद्धेला दाखल करून घेतले, अशी माहिती आरे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी दिली. आम्ही महिलेला सोडू शकत नव्हतो. त्यामुळे ९ तास आम्हाला त्या वृद्धेला घेऊन वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये फिरावे लागले असेही त्यांनी सांगितले.
महिलेच्या कुटुंबियांचा शोध सुरू
या महिलेची प्रकृती नाजूक आहे. तिला फारसे बोलता येत नाही. तिने मुलाचे नाव सांगितले आहे. मालाड आणि कांदिवली येथील मोघम पत्ता ती सांगू शकली. पोलिसांनी त्या परिसरात शोध घेतला मात्र तिचे घर आढळले नाही. या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. पहाटेच्या अंधारात तिला या परिसरात आणून टाकल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सध्या आम्ही या महिलेचे छायाचित्र सर्वत्र प्रसारीत केले असून तिच्या कुटुंबियांचा शोध घेत आहोत, अशी माहिती अशी माहिती आरे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी दिली.