मुंबई : सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे शेतीला दिवसा वीज उपलब्ध होत असून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होत आहे. मात्र शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीवर भर देऊन कमी खर्चात जास्त उत्पन्न देणाऱ्या पीक पद्धतीचा वापर करावा. शेतीचे आरोग्य संवर्धन उपाय होणे, ही काळाची गरज आहे. या सौर ऊर्जा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले. पंतप्रधान मोदी यांनी दूरदृश्य प्रणाली द्वारे राज्यातील २,४५८ मेगावॅट क्षमतेच्या ४५४ सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण केले.

राजस्थानातील बांसवाडा येथे ऊर्जा तसेच विविध विकास योजनांचा लोकार्पण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण बांद्रा पूर्व प्रकाशगड येथून करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक बी राधाकृष्णन, पंतप्रधान कुसुम योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणि मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचे लाभार्थी शेतकरी यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात मोदी यांनी राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पातील विविध लाभार्थ्यांशी संवाद साधला.

सौर ऊर्जा प्रकल्पाचे खूप फायदे आहेत. दिवसा वीजेबरोबरच बारमाही पाण्याची व्यवस्था झाली आहे. आता शेतकऱ्यांनी रासायनिक खते न वापरता शेती करण्यावर भर दिला पाहिजे. झिरो बजेट नैसर्गिक शेतीवर भर दिल्यास रासायनिक खते, कीटकनाशके यांचा वापर कमी करून खर्च कमी होतो. शेतकऱ्यांच्या खर्चात बचत होते आणि जमिनीचे आरोग्य सुधारते. त्याचबरोबर पारंपारिक शेतीऐवजी काळानुरूप बदलती शेती करणे गरजेचे आहे, असे मोदी यांनी नमूद केले.

भारताला आज खाद्यतेलाची आयात करावी लागते. ही समस्या सोडविण्यासाठी शेतकऱ्यांनी खाद्यतेल बियांची लागवड करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर तृणधान्यालाही ( मिलेट) सध्या खूप मागणी आहे. हे लक्षात घेवून लागवड केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल होईल, असे मोदी यांनी सांगितले.