मुंबईतील पूर्व उपनगरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी दोन महत्त्वाचे प्रकल्प आजपासून (गुरुवार) वाहतूक सेवेत दाखल होत आहे. छेडानगर जंक्शनवरील १२३५ मीटर लांबीच्या उड्डाणपुलाच्या, तसेच कपाडिया नगर – वाकोला नाला दरम्यानच्या ३.०३ किमी लांबीच्या उन्नत मार्गाच्या रखडलेल्या लोकार्पणासाठी अखेर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) मुहूर्त मिळाला. हा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरुवार, १३ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. लोकार्पणानंतर तात्काळ हे दोन्ही प्रकल्प वाहतूक सेवेत दाखल केले जाणार असून यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पूर्वमुक्त मार्गावरून सुसाट येणाऱ्या वाहनांना छेडानगर जंक्शन येथील वाहतूक कोंडीत अडकावे लागते. त्यामुळे एमएमआरडीएने छेडा नगर वाहतूक सुधार प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाअंतर्गत छेडा नगर येथे तीन उड्डाणपूल आणि एक सब-वे बांधण्यात येत आहेत. यापैकी पहिला तीन मार्गिकेचा पूल ६८० मीटर लांबीचा असून तो शीव आणि ठाण्याला जोडणाऱ्या मार्गावर आहे. दुसरा दोन मार्गिकेचा १,२३५ मीटर लांबीचा उड्डाणपूल मानखुर्द आणि ठाण्याला जोडणाऱ्या मार्गावर आहे. तर तिसरा ६३८ मीटर लांबीचा छेडा नगर उड्डाणपूल सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्त्याला जोडण्यात आला आहे. यासाठी २४९.२९ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. तीन उड्डाणपुलांपैकी ६३८ मीटर लांबीचा छेडा नगर उड्डाणपूल मार्च २०२२ मध्ये वाहतुकीस खुला झाला आहे. छेडा नगर उड्डाणपुलासह ५१८ मीटर लांबीच्या आणि ३७.५ मीटर रुंदीच्या सब-वेचा पहिला टप्पाही वाहतुकीसाठी खुला झाला आहे. आता छेडानगर जंक्शन परिसरातील १,२३५ मीटर लांबीच्या मानखुर्द आणि ठाण्याला जोडणाऱ्या रस्त्यावरील पुलाचे काम पूर्ण झाले आहे.

हेही वाचा >>>मुंबई: घटस्फोटीत नोकरदार स्त्रीलाही मूल दत्तक घेण्याचा अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

छोडानगरमधील या उड्डाणपुलासह कपाडियानगर – वाकोला नाला या ३.०३ किमी लांबीच्या उन्नत मार्गाचेही काम पूर्ण झाले आहे. कुर्ल्यातील कपाडियानगर येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी, तसेच सांताक्रूझ – चेंबूर जोडरस्त्यावरून पुढे बीकेसी आणि वाकोल्याला जाणे सोपे व्हावे यासाठी एमएमआरडीएने जोडरस्ता विस्तारीकरण प्रकल्प हाती घेतला आहे. याअंतर्गत कपाडिया नगर, कुर्ला ते वाकोला आणि वाकोला ते भारत डायमंड बोर्स असे दोन उन्नत मार्ग बांधण्यात येत आहेत. या कामास २०१६ मध्ये सुरुवात झाली असून हे काम २०२० मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र विविध कारणांमुळे या प्रकल्पास विलंब झाला. या दोन्ही उन्नत मार्गातील पहिला टप्पा नुकताच वाहतूक सेवेत दाखल झाला. कपाडिया नगर – वाकोला (हंसभुर्गा मार्ग) उन्नत मार्गातील महाराष्ट्र राज्य अग्निशामक इमारत ते रजाक जंक्शन या टप्प्यातील एक मार्गिका (वाकोल्याच्या दिशेने जाणारी), एमटीएनएल जंक्शन ते एलबीएस या टप्प्यातील एक मार्गिका (बीकेसीच्या दिशेने जाणारी) काही दिवसांपूर्वीच वाहतुकीसाठी खुली झाली आहे.तर कपाडिया नगर – वाकोला नाला अशा ३.०३ किमी लांबीच्या उन्नत मार्गाचेही काम पूर्ण झाले आहे.

हेही वाचा >>>मुंबईः ३५ वर्षांपासून फरारी ‘पेटबली’ अखेर पोलिसांना सापडला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे प्रकल्प एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यातच पूर्ण झाले आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण करण्याचा एमएमआरडीएचा हट्ट होता. त्यामुळे लोकार्पण लांबणीवर पडले होते. यासंबंधीचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झाले होते. तर लोकार्पण होत नसल्याने त्रासलेल्या नागरिकांनीच उन्नत मार्गावरून वाहने नेण्यास सुरुवात केली. यासंबंधीची माहिती मिळताच एमएमआरडीएने मंगळवारी सकाळी हा उन्नत मार्ग तात्काळ वाहतुकीसाठी बंद केला. यासंबंधीचेही वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झाले होते. दरम्यान, प्रकल्प पूर्ण असताना केवळ लोकार्पणाच्या हट्टामुळे वाहनचालक-प्रवाशांना वेठीस धरले जात होते. हे दोन्ही प्रकल्प तात्काळ सेवेत दाखल करण्याची जोरदार मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर अखेर आता लोकार्पणासाठी मुहुर्त मिळाला आहे.