मुंबई: शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्यानंतर मंगळवारी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांच्यासह परिवहनमंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित संजय कदम व बजरंग खरमाटे यांच्यावर प्राप्तिकर विभागाचे मंगळवारी छापे पडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे दिल्लीचे महाराष्ट्रावरील आक्रमण असून निवडणुका आल्याने हे छापे पडत असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली.  सक्तवसुली संचालनालयाने अनिल परब यांना नोटीस पाठवून नंतर त्यांची चौकशी केली होती. त्यानंतर संजय राऊत यांच्या पत्नीची चौकशी ईडीने केली होती. खासदार भावना गवळी, माजी खासदार आनंद अडसूळ यांनाही ईडीने नोटिसा बजाविल्या आहेत.  त्यानंतर केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत असल्याची टीका शिवसेनेने केली आहे. ईडीच्या कारवाईच्या सत्रानंतर काही दिवसांपूर्वी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर प्राप्तिकर विभागाचे छापे पडले.  पूर्वी काँग्रेसमध्ये असलेले व आता युवासेनेत आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे राहुल कनाल यांच्यावर छापे पडले.

युवासेनेत सक्रिय असलेले कनाल यांची नुकतीच शिर्डी संस्थानावर विश्वस्त म्हणून नियुक्ती झाली होती. त्याचबरोबर अनिल परब यांच्या जवळचे संजय कदम यांच्यावर आणि परिवहन विभागातील अधिकारी बजरंग खरमाटे यांच्यावर छापे पडले. कनाल यांच्या वांद्रे येथील ‘नाईन अल्मेडा’ इमारतीमधील घरावर प्राप्तीकर विभागाने छापा टाकला.

संजय कदम हे शिवसेनेच्या अंधेरी पश्चिम मतदारसंघाचे संघटक आहेत. तर बजरंग खरमाटे हे परिवहन विभागातील अधिकारी असून त्यांच्यामाध्यमातून अनिल परब यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.

दिल्लीचे आक्रमण -आदित्य ठाकरे

या प्राप्तिकर छाप्यांनंतर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली. महाराष्ट्रावर यापूर्वीही आक्रमणे झाली आहेत. हे दिल्लीचे आक्रमणच आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये निवडणूक तोंडावर आल्यानंतर महाविकास आघाडीची भाजपला भीती वाटायला लागली. त्यामुळेच हे छापे सुरू आहेत. उत्तर प्रदेशमध्येही असेच झाले होते. हैदराबादमध्येही हेच झाले. बंगालमध्येही हेच केले. आता महाराष्ट्रात निवडणुका येऊ घातल्या आहेत. म्हणून छापे सुरू झाले आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा भाजपची प्रचार यंत्रणा झाली आहे. महाराष्ट्र झुकणार नाही आणि महाराष्ट्र थांबणार नाही, अशी टीका ठाकरे यांनी केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Income tax department raids shiv sena leader rahul kanal s premises zws
First published on: 09-03-2022 at 03:26 IST