मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मुंबई महानगर प्रदेशात विविध मेट्रो मार्गिकांची कामे हाती घेतली आहेत. यापैकी काही मार्गिकांचा पहिला टप्पा डिसेंबरअखेरीस वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. या मार्गिकांच्या कामाला गती मिळावी यासाठी मनुष्यबळात वाढ करण्यात आली असून एमएमआरडीएने मनुष्यबळ धोरण लागू केले आहे. याचा सकारात्मक परिणाम होत असून ‘मेट्रो २ ब’ (अंधेरी पश्चिम ते मंडाले), ‘मेट्रो ४’, ‘मेट्रो ४ अ’ (वडाळा – ठाणे – कासारवडवली – गायमुख) आणि ‘मेट्रो ९’ (दहिसर ते मिरा-भाईंदर) मार्गिकांच्या कामातील मनुष्यबळात १७ ते ३७ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गिकांच्या कामाला गती आली आहे.
एमएमआरडीएकडून ‘मेट्रो २ ब’, ‘मेट्रो ४’, ‘मेट्रो ४ अ’, ‘मेट्रो ५’ (ठाणे – भिवंडी – कल्याण), ‘मेट्रो ६’ (स्वामी समर्थनगर – विक्रोळी), ‘मेट्रो ७ अ’ (अंधेरी पूर्व – विमानतळ, मुंबई), ‘मेट्रो ९’ (दहिसर – मिरा-भाईंदर) या मेट्रो मार्गिकांची कामे सुरू आहेत. यापैकी ‘मेट्रो २ ब’ मार्गिकेतील डायमंड गार्डन – मंडाले पहिला टप्पा, ‘मेट्रो ४’, ‘मेट्रो ४ अ’ मार्गिकेतील कॅडीबरी जंक्शन – गायमूख पहिला टप्पा, तसेच ‘मेट्रो ९’ मार्गिकेतील दहिसर – काशीगाव पहिला टप्पा या वर्षात वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. ‘मेट्रो २ ब’ आणि ‘मेट्रो ९’ मार्गिकांतील पहिल्या टप्प्यादरम्यानच्या मार्गिकांवर मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्याकडून प्राथमिक निरीक्षणही पूर्ण करण्यात आले आहे. तर मेट्रो गाड्यांच्या दैनंदिन चाचण्या सुरू आहेत. दरम्यान, अपुऱ्या मनुष्यबळामुळे मेट्रो मार्गिकांच्या कामाला विलंब होत असल्याचे निदर्शनास आले होते. मेट्रो मार्गिकांच्या कामास विलंब होऊ नये यासाठी एमएमआरडीएने काही दिवसांपूर्वी मनुष्यबळ धोरण आखून त्यांची अंमलबजावणी सुरू केली.
मनुष्यबळ कमी असल्यास दंड
मनुष्यबळ धोरणानुसार २५ ते ५० टक्के मनुष्यबळ कमी असल्यास कंत्राटदारांना प्रतिदिन एक लाख रुपये दंड आकारण्यात येतो. तर ५० टक्क्यांहून अधिक मनुष्यबळ कमी असल्यास प्रतिदिन २ लाख रुपये दंड आकारणी आहे. हे धोरण लागू झाल्यानंतर ‘मेट्रो २ ब’, ‘मेट्रो ४’, ‘मेट्रो ४अ’ आणि ‘मेट्रो ९’ मार्गिकांवरील कामगारांच्या संख्येत १७ ते ३७ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ‘मेट्रो ४’ मार्गिकेतील कंत्राटदारांने ओडिशामधून ६० कामगार बोलवले आहेत. तर येत्या आठवड्यात उत्तर प्रदेशातून आणखी १५० कामगार प्रकल्पस्थळी दाखल होणार आहेत. कामगारांची संख्या वाढत असल्याने मेट्रोच्या कामांना गती मिळणार असून कामे निर्धारित वेळेत पूर्ण होतील, असा विश्वास एमएमआरडीएला आहे. दरम्यान, एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सर्व प्रकल्पस्थळांवर, कामगारांच्या संख्येवर लक्ष ठेवले आहे, नियमित आढावाही घेण्यात येत आहे.