विरोधानंतर वापर आणि मागणीत वाढ, महिलाहक्काचा आग्रह

मुंबई : कर्नाटकमधील महाविद्यालयांत हिजाबवर बंदी घालण्यावरून सुरू झालेल्या वादाचे पडसाद देशभर उमटत असताना राज्यात मात्र थोडे वेगळे चित्र दिसत आहे. महाविद्यालयांनी अशा प्रकारे धर्माला लक्ष्य करणारा पोशाखविरोध केल्यास आम्ही देखील हिजाब वापरू, अशी भूमिका घेत तुरळक स्वरूपात हिंदूू मुली मुस्लिम विद्यार्थिनींच्या समर्थनार्थ उभ्या राहत आहेत. तर विरोधामुळे केवळ शैक्षणिक स्तरावरच नाही तर समाजात वावरताना हिजाब वापरण्याचे प्रमाण गेल्या आठवडय़ात वाढल्याचे दिसत आहे.

हिजाब वापरणे अथवा नाकारणे हे स्त्रीचे स्वातंत्र्य किंवा तिच्या वैयक्तिक श्रद्धेचा भाग आहे. केवळ हिजाब वापरल्यामुळे मुलींच्या शिक्षणात अडथळे निर्माण केले जात असतील, तर आम्हीही हिजाब घालून महाविद्यालयांत जाऊ, अशी चर्चा महाविद्यालय तरुणी समाज माध्यमांवर करताना दिसत आहेत. विद्यार्थी संघटना, सामाजिक संघटनांशी जोडलेल्या कार्यकर्त्यांनीही याबाबत भूमिका घेतली आहे. विद्यार्थी संघटनांनी मात्र अधिकृतपणे हिंदू मुलींनी मुस्लीम विद्यार्थिनींच्या समर्थनार्थ हिजाब वापरावा किंवा तत्सम आवाहन केलेले नाही.

विद्यार्थिनी म्हणतात..

बहुतेक महाविद्यालयांमध्ये गणवेश नसतो. अशावेळी विद्यार्थिनी त्यांच्या धर्मानुसार किंवा आवडीनुसार पोषाख करत असतील तर त्यावर कुणीच आक्षेप घेऊ नये, असे मत मुंबईतील विद्यार्थिनीने व्यक्त केले. आम्ही पुण्यात हिजाबसारखीच चेहरा झाकणारी ओढणी घेतो. अनेक मुली वेगवेगळय़ा प्रकारच्या टोप्या घालतात. त्याला कोणत्याही धर्माची ओळख नाही. उद्या कुणी त्यालाही विरोध करेल. सार्वजनिक सभ्यतेला धक्का पोहोचणार नाही, असा कोणताही पोषाख घालणे हे आमचे स्वातंत्र्य आहे, असे पुण्यातील विद्याथिर्नीनी सांगितले. माझ्या अनेक मुस्लिम मैत्रिणी आहेत, त्या हिजाब वापरतात. त्यांच्याबरोबर खरेदी करताना मीही हिजाब घेतला आहे. छान नक्षीदार हिजाब मला आवडतात. तो वापरावा की नाही हे आमचे स्वातंत्र्य आहे, असे विधि शाखेच्या मुंबईतील विद्यार्थिनीने सांगितले.

मुंबईत यापूवीर्ही वाद

मुंबईत हिजाब वापरण्यावरून काही महाविद्यालयांमध्ये यापूर्वीही वाद झाले आहेत. चार वर्षांपूर्वी एका परिचारिका महाविद्यालयात अशाच स्वरूपाचा वाद झाला होता. त्यानंतर हिजाब घालून गेल्यामुळे एका विद्यार्थिनीला परीक्षेला बसण्यास मनाई करण्यात आली होती. त्यावेळीही आम्ही त्याचा निषेध केला होता. त्यामागे हिजाब सक्तीला समर्थन नव्हते, असे विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

कल्याणमध्ये काँग्रेसचे आंदोलन,मुस्लिम महिलांचा मात्र आक्षेप

कल्याण : कर्नाटकमधील हिजाब प्रकरणावरून कल्याण जिल्हा महिला काँग्रेसतर्फे शनिवारी शिवाजी चौकात निदर्शने करण्यात आली. कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू असताना तेथे काही मुस्लिम महिला हिजाब घालून आल्या. त्यांनी निदर्शने करणाऱ्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांना, ‘‘राजकीय स्वार्थासाठी हिजाब प्रश्नावर आंदोलन करू नका, हिजाब घालणे हा मूलभूत अधिकार आहे’’, असे सांगितले. त्यामुळे तेथे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

काय होतेय?  महिलांच्या पोषाखावर निर्बंध आणण्यास किंवा पोषाखामुळे विद्याथिर्नीना शिक्षणापासून वंचित ठेवण्यास आमचा तीव्र विरोध आहे, अशी भूमिका विद्यार्थिनींनी घेतली आहे. मुंबई, पुणे, औरंगाबादसह विविध भागांतील महिला, विद्यार्थिनी मुस्लिम महिलांना पाठिंबा दर्शवत आहेत. त्यात अन्य धर्मीय मुलीही सहभागी होत आहेत.

भूमिका काय?

हिजाब वापरला म्हणून शिक्षणासारख्या मूलभूत हक्कापासून वंचित राहावे लागणे चुकीचे आहे. त्याचवेळी हिजाब वापरण्याची सक्तीही योग्य नाही. बंदी किंवा सक्ती अशा दोन्हींना विरोधच असेल, कारण दोन्ही भूमिका महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या, त्यांचे नुकसान करणाऱ्या आहेत. बंदी घालाल तर हिजाबचे समर्थन करू आणि सक्ती कराल तर त्याला विरोध करू, अशी भूमिका विद्यार्थिनी उघडपणे घेत आहेत