अवघे जग ‘५जी’चा आनंद घेत असताना आपण मात्र ‘४ जी’च्या लिलावाची तयारी करत आहोत. आपल्याकडील हा तंत्रमागासलेपणा का आहे? ‘४ जी’ आल्याने आपल्या तंत्रजीवनात काय फरक पडणार आहे? या सर्वावर आयआयटी, मुंबईतील इलेक्ट्रॉनिक इंजिनीअरिंग विभागातील प्राध्यापक आणि मोबाइल टॉवर्सचे गाढे अभ्यासक डॉ. गिरीश कुमार यांच्याशी केलेली बातचीत.
*भारतात तंत्रज्ञानाचा वापर सर्वाधिक होतो, असे असतानाही जगात ५जी चा बोलबाला असताना आपण ४जीचा लिलाव करत आहोत. हा तंत्रमागासलेपणा का?
– खरंय आपण तंत्रज्ञानात दहा वष्रे मागे आहोत. त्याला कारणही तसेच आहे. एखादे तंत्रज्ञान नवीन असते तेव्हा त्याची किंमत ही खूप जास्त असते. त्यामुळे ती आपल्याकडे वापरणे खूप खर्चीक असते. यामुळेच त्या तंत्रज्ञानावर अधिकाधिक संशोधन झाले आणि त्याच्या वापराची किंमत कमी झाल्यावर ते आपल्याकडे येते. जगात मोबाइलचा वापर १९८० मध्ये सुरू झाल्यावर भारतात मोबाइल येण्यास तब्बल १५ वष्रे जावी लागली. हाच उशीर यापुढील तंत्रज्ञानावर होत राहिला. त्यामुळेच आपण काळाच्या मागे धावत असतो.
*यामागची करणे काय?
– स्वाभाविकपणे परदेशी तत्रज्ञान आपल्याकडे वापरणे हे खर्चीकच होणार त्यामुळे त्यावर उपाय म्हणजे आपल्याकडे संशोधन वाढले पाहिजे. ते वाढण्यासाठी सरकारी पातळीवरून विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे. म्हणजे मोबाइल कंपन्यांना देशात मोबाइल विकायचे असेल तर त्यांनी मोबाइल उत्पादनाचा एक तरी प्लांट देशात सुरू करणे सक्तीचे केले पाहिजे. जेणेकरून आपल्याला देशात रोजगार निर्माण होतील आणि त्यांच्या उत्पन्नातील काही रक्कम देशातच राहील. देशात ९० कोटी मोबाइलधारक आहेत प्रत्येकाचा मोबाइल किमान दोन हजार रुपयांचा असेल असे गृहीत धरले तर यामाध्यमातून कंपन्यांना एक लाख ८० हजार कोटी रुपये मिळतात. देशात उत्पादन सुरू झाले तर यातील काही रक्कम आपल्या देशातच राहील. याचबरोबर सरकारने देशातील उद्योजकांना पुढे येण्यासाठी वाव दिला पाहिजे. मोबाइलची नेटवर्क सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांनी आपल्या नफ्यातील काही रक्कम संशोधनात गुंतवली तर आपण जगाच्या तुलनेत दूरसंचार क्षेत्रात जेवढे मागे आहोत ते अंतर कमी करणे आपल्याला शक्य होईल.
*४ जी आल्याने मोबाइल वापरण्यात काय फरक पडेल?
– ४ जी हे दूरसंचारमधील सर्वात चांगले संशोधन आहे. याला आपण दूरसंचाराची चौथी पिढी असे संबोधतो. यामध्ये ज्याच्याकडे स्पेक्ट्रम जास्त येतील तो या बाजाराचा राजा असेल. कारण देशात हीच सध्याची आधुनिक सुविधा असेल. आता  आपल्याकडे २.५जी आणि ३जी या सुविधा उपलब्ध आहेत. ३जीच्या दसपट आशा वेगाने काम करणारी ही यंत्रणा आहे. त्यात गुंतवणूक जास्त असली तरी कंपन्यांच्या स्पर्धामुळे ग्राहकांपर्यंत ही सेवा ३जीच्या दारातच पोचणे शक्य होणार आहे. ४जीने ‘मॅजिक’ आपल्याला मिळणार आहे. हे म्हणजे जादू नव्हे तर एम – मल्टीमीडिया, ए – एनीटाइम एनीव्हेअर, जी – ग्लोबल मोबॅलिटी सपोर्ट, आय- इंटिग्रेटेड वायरलेस सोल्युशन, सी- कस्टमाइज पर्सनलाइज सव्‍‌र्हिसेस. या सर्व सेवा म्हणजे एक जादुई अनुभव आपल्यासाठी असतील. त्यात आपल्याला अधिक जास्त सुरक्षा मिळणार आहे. यामध्ये आपण टीव्ही अगदी सहजपणे पाहू शकतो. ज्यामुळे भविष्यात मोबाइल वाहिन्यांची गर्दीही वाढण्याची शक्यता आहे. याच्याही काही त्रुटी असून याचा वापर करायचा असेल तर कंपन्यांना अधिक बॅटरीची क्षमता असलेले फोन तयार करावे लागणार आहेत. तसेच त्यांना टॉवरसाठी अधिक गुंतवणूक करावी लागणार आहे. नसतील तर आपल्याला दर अध्र्या तासाला फोन चार्ज करावा लागेल.
*४जी वापरण्यासाठी हार्डवेअरच्या बाबतीत काय बदल होतील?
– अद्ययावत तंत्रज्ञान आले की ते वापरण्यासाठी विशेष बदल करणे गरजेचे असतात. ४जीच्या बाबतीतही तेच आहे. याचा वापर करण्यासाठी आपल्याला आता आपण वापरत असलेल्या मोबाइलचा उपयोग होणार नाही. आपल्याकडे सध्या जे मोबाइल उपलब्ध आहेत ते सर्व मोबाइल ३जी पर्यंत वापरता येणारे आहेत. अर्थात आता अनेक कंपन्यांनी ४जीचे फोन बनविणे सुरू केले असून त्यातील काही बाजारत उपलब्ध होण्यास सुरुवातही झाली आहे.
*४जीच्या त्रुटी काय आहेत?
– ४जीच्या त्रुटी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यासाठी जास्त क्षमतेचे मोबाइल टॉवर्स उभारावे लागणार आहे. ज्यामुळे मोबाइल किरणांचा होणारा त्रास अधिक वाढणार आहे. सध्या आपल्याकडे २जी आणि ३जी वापरले जाते. त्यासाठी कंपन्या २० वॉटच्या क्षमतेने किरणांचे उत्सर्जन करत असतात. हेच प्रमाण आता ते तब्बल ४० वॉटपर्यंत वाढविणार आहे. कमी टॉवर्सचा वापर करून जास्तीत जास्त भागात नेटवर्क पोहचवणे हा कंपन्यांचा उद्देश असतो यामुळे ते जास्त क्षमतेचा वापर करतात. याचा परिणाम टॉवरच्या परिसरात राहणाऱ्या लोकांवर होत असल्याची निरीक्षणे आहेत. ४जीसाठी ही क्षमता अधिक होण्याची शक्यता आहे यामुळे मोबाइल कंपन्यांनी टॉवरची संख्या वाढवावी आणि कमी क्षमतेने किरणांचे उत्सर्जन करावे.
*सर, तुम्ही म्हणता मोबाइल टॉवरमुळे लोकांना आजार होतात पण असेही काही अभ्यास आहेत ज्यामध्ये आजार होत नसल्याचे दिसून आले आहेत. नेमके लोकांनी समजायचे तरी काय?
– कोणत्याही प्रकारच्या किरणोत्सर्गाने अपाय होतच असतो. अगदी आपण वैद्यकीय तपासणीसाठी काढत असेलेल्या एक्स-रे मुळेही अपाय होतात. म्हणून डॉक्टरांनी त्याच्या वापरावर काही र्निबध आणले आहेत. तेच नेमके मोबाइल टॉवरच्या बाबतीत आहे. अपाय होतात म्हणून मोबाइल वापरणे बंद करा असे कुणाचे म्हणणे नाही. आता ते शक्यही नाही. परंतु, त्याच्या वापरावर आपण नियमन आणू शकतो. कंपन्यांनी टॉवर्समधून होणाऱ्या किरणांच्या उत्सर्जनाची काळजी घ्यावी आणि वापरकर्त्यांने मोबाइल वापरण्याचे नियमन घालावे हे योग्य प्रकारे झाले तर मोबाइल तत्रज्ञान हे वापरणे आणखी सुसह्य़ होईल.