मुंबई : महात्मा गांधी यांनी मुंबईतूनच ब्रिटिशांना ‘चले जाव’ असे बजावले होते. त्याच मुंबईतून आता ‘मोदी सरकार चले जाव’ असा नारा देण्यात येत असल्याची घोषणा ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांनी केली. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’च्या समारोप रविवारी शिवाजी पार्क येथील सभेने झाला. लोकसभा निवडणुका जाहीर झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी झालेल्या सभेत आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ एक मुखवटा आहेत. ते आपले लक्ष विचलित करण्याचे काम करतात, देशाच्या व्यवस्था नियंत्रित करणारी शक्ती वेगळी आहे. मोदी आणि त्यांच्या पाठिशी असलेल्या अदानी व इतर मूठभर उद्योगपतींनी लूटमार चालवली असल्याचा आरोप त्यांनी केला. गांधी म्हणाले की, भारत जोडो यात्रा माझी एकटयाची नाही, इंडिया आघाडीचे सगळे नेते-कार्यकर्ते त्यात सहभागी होते. देशाची जनसंपर्काची माध्यमे देशाच्या हातात राहिली नाहीत. त्यामुळे शेतकरी, युवा, महिलांचे प्रश्न, बेजोगारी, महागाई हे मुद्दे लोकांसमोर मांडण्यासाठी आपण कन्याकुमारी ते काश्मीर आणि मणिपूर ते मुंबई यात्रा काढल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा >>> पंतप्रधानांच्या सभेचे आधी काम, नंतर निविदा सूचना! २०.५५ कोटींची कामे; बांधकाम विभागाचा कारभार

एका उद्योगपतीकडील विवाहासाठी विमानतळाला तात्काळ आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात आला. मात्र गोरगरीबांसाठी सरकार असे तात्काळ निर्णय कधी घेत नाही, असा आरोप राहुल गांधी यांनी अंबानी यांचे नाव न घेता केला.  मतदान यंत्राशिवाय मोदी कदापिही निवडणुका जिंकू शकत नाहीत. व्हीव्ही पॅटच्या चिठ्ठय़ंची मोजणी करावी, ही आमची मागणी आहे. पण निवडणूक आयोग याला का तयार नाही, असा सवालही राहुल गांधी यांनी केला. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून मोदी यांनी भष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी केला. रस्त्यावरची हप्तेवसुली त्यांनी देशपातळीवर नेली असा घणाघात करताना कंपन्यांना कंत्राटे देऊन, सीबीआय, ईडी चौकशीची भीती दाखवून पेैशांची लूट केल्याचा त्यांचा आरोप आहे. या सभेला काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, तमिळनाडूचे मुख्यमंत्री व द्रमुकचे नेते स्टॅलिन, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते डॉ. फारुक अब्दुल्ला, झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन, राजद नेते तेजस्वी यादव, ‘आप’चे सौरभ भारद्वाज, पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखिवदरसिंह सुक्खू आदी उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विरोधात बोलल्याने ईडी कारवाई

भूसंपादन कायद्याला विरोध करू नये, यासाठी तत्कालिन मंत्री अरुण जेटली माझी भेट घेण्यासाठी निवासस्थानी आले होते. विरोधात बोलल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा देण्यात आला होता. मात्र आपण सरकारविरोधात बोलत राहिलो. उद्योगपतींच्या फायद्यासाठी भूसंपादन कायद्याची मोदी सरकारला घाई झाली होती. काँग्रेसने लोकांच्या बाजूने उभा राहिला. त्याची किंमत आपल्याला चुकवावी लागली. त्यानंतर ईडीने ५० तास बसवून आपली चौकशी केली. त्यावेळी ईडीचा एक अधिकारी केवळ आपणच मोदींच्या विरोधात बोलू शकतो, असे म्हणाल्याची आठवणही राहुल गांधी यांनी सांगितली. आम्ही ‘इंडिया’ आघाडी म्हणून भाजपाच्या विरोधात लढत आहोत, हे खरे नाही. नरेंद्र मोदी केवळ मुखवटा आहेत. मोदी ५६ इंच छातीचे नाहीत. ती पोकळ व्यक्ती आहे. त्यांच्यामागे असलेल्या शक्तीच्या विरोधात आमची लढाई आहे. – राहुल गांधी, काँग्रेस नेते