मुंबई :भारतात मृत्यूंच्या प्रमुख कारणांमध्ये मोठा बदल झाल्याचे नव्या जागतिक अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. संसर्गजन्य आजारांऐवजी आता हृदयविकार, मधुमेह, स्ट्रोक यांसारख्या संसर्गजन्य नसलेल्या आजारांचा (एनसीडी) प्रभाव वेगाने वाढत आहे.

बर्लिनमध्ये नुकत्याच झालेल्या वर्ल्ड हेल्थ समिटमध्ये प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज २०२३ अहवालानुसार, जगभरातील दोन-तृतीयांश मृत्यू आता असंसर्गजन्य आजारांमुळे (एनसीडी)मुळे होत आहेत. हा अहवाल ‘द लॅन्सेट’ या प्रतिष्ठित वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

भारतात १९९० मध्ये संसर्गजन्य आजार मृत्यूचे प्रमुख कारण होते. प्रती लाख लोकांमागे ३००.५३ मृत्यू हे संसर्गजन्य आजारांमुळे होत असते. त्यात २०२३ मध्ये बदल होऊन इस्केमिक हृदयविकार मृत्यूचे अग्रस्थानी कारण ठरले. प्रती लाख लोकसंख्येत या आजारामुळे १२७.८२ लोकांचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज ९९.२५ आणि स्ट्रोक ९२.८८ ही प्रमुख कारणे ठरली. १९९० मध्ये क्षयरोग आणि हृदयविकार जवळपास समान प्रमाणात मृत्यूला कारणीभूत होते. आता मात्र जीवनशैलीशी निगडित असंसर्गजन्य आजारांनी आता आजारांनी संसर्गजन्य आजारांना मागे टाकले आहे.

एकीकडे आरोग्य विषयक वैज्ञानिक प्रगतीमुळे आयुर्मान वाढले आहे मात्र त्याचवेळी या आजारांचे ओझेही वाढले आहे. जीबीडी अहवालानुसार, भारतातील एकूण मृत्यू १९९० मधील ५१.५३ लाखांवरून २०२३ मध्ये ८७.१ लाखांवर गेले. याच काळात सरासरी आयुर्मानात १३ वर्षांची वाढ झाली आहे. पुरुषांचे आयुर्मान ५८.४६ वरून ७१.६२ वर्षांपर्यंत, तर महिलांचे ५९.८ वरून ७२.९६ वर्षांपर्यंत वाढले.डॉ. सौम्या स्वामीनाथन, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या माजी प्रमुख म्हणाल्या,आयएचएमई गेल्या दशकभरापासून भारतातील असंंसर्गजन्य आजारांच्याच्या वाढीवर लक्ष ठेवत आहे. ही आकडेवारी आरोग्य धोरणे ठरवण्यासाठी निर्णायक ठरते. त्यांच्या मते लोकसंख्या वाढ आणि वृद्धत्वामुळे एनसीडीचा भार वाढतो आहे, तर अस्वास्थ्यकर आहार आणि निष्क्रिय जीवनशैली हे प्रमुख जोखमीचे घटक ठरले आहेत.सार्वजनिक आरोग्य प्रतिष्ठानचे माजी प्रमुख प्रा. के. श्रीनाथ रेड्डी यांनी औद्योगिकीकरणासोबत वाढलेल्या प्रदूषण व चुकीच्या आहाराला जबाबदार ठरवले. औद्योगिकीकरणामुळे प्रदूषण, निष्क्रियता आणि चुकीचा आहार या सर्व गोष्टींनी एनसीडी वाढताना दिसतो असे ते म्हणाले.

मानसिक आरोग्याचे संकट वाढत असून तरुणांमधील वाढते मृत्यू त्याचे उदाहरण आहे. जीबीडी २०२३ च्या निष्कर्षानुसार, मानसिक आरोग्य विकारांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.चिंताग्रस्तता विकारांत ६३ टक्के आणि नैराश्य विकारांत २६ टक्के वाढ नोंदली गेली आहे.लैंगिक हिंसा, अत्याचार आणि सामाजिक असुरक्षितता हे मानसिक आरोग्यावर परिणाम करणारे प्रमुख घटक म्हणून नमूद करण्यात आले आहेत. आयसीएमआरचे माजी अधिकारी डॉ. समिरन पंडा म्हणाले, ग्रामीण व शहरी भागांतील पोषण-असुरक्षितता अजूनही कायम असून मानसिक आरोग्याच्या समस्या अधिक तीव्र होत आहेत.तरुण आणि किशोरवयीनांमध्ये मानसिक विकार झपाट्याने वाढत आहेत. २०१० ते २०२३ दरम्यान जखमांमुळे होणाऱ्या ‘डिसएबिलिटी अॅडजस्टेड लाइफ इयर्स’ मध्ये १६% घट झाली असली, तरी मानसिक विकारांमुळे त्यात ३५ टक्के वाढ झाल्याचे जीबीडीचे सहलेखक डॉ. समंथा गोकलदास यांनी सांगितले.

भारताता लहान मुलांच्या आरोग्याचे अनेक प्रश्न आहेत.५ वर्षांखालील मुलांमध्ये मृत्यूंची प्रमुख कारणे कुपोषण, हवेचे प्रदूषण आणि अस्वच्छ पाणी व स्वच्छतेचा अभाव ही आहेत.५ ते १४ वर्षांच्या मुलांमध्ये संसर्गजन्य आजार आणि पोषणत्रुटी हीच मोठी कारणे ठरली. तर १५ ते ४९ वयोगटातील प्रौढांमध्ये उच्च रक्तदाब, स्थूलता, कोलेस्टेरॉल आणि मानसिक ताण हे धोके गंभीर ठरले आहेत.

या अहवालात नमूद केले आहे की, बालमृत्यू दर घटवण्यासाठी आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी तातडीने उपाययोजना आवश्यक आहेत. परिणामी संसर्गजन्य आजारांइतकेच लक्ष आता असंसर्गजन्य व मानसिक आरोग्यावर देणे अत्यावश्यक असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.