मुंबई: नेस्को, गोरेगाव येथे आयोजित ‘इंडिया मेरीटाईम वीक २०२५’ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सागरी व्यापार आणि उद्योगाशी संबंधित ५५ हजार ९६९ कोटी रुपयांचे १५ विविध सामंजस्य करार करण्यात आले. या करारांच्या माध्यमातून महाराष्ट्र देशाच्या सागरी व्यापार आणि उद्योग क्षेत्राचे नेतृत्व करेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. यावेळी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, बंदरे विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप आणि सामंजस्य करार करण्यात आलेल्या कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

५५ हजार ९६९ कोटी रुपयांच्या करांरामुळे सागरी व्यापार आणि विकासाच्या क्षेत्रात राज्याला आघाडीवर नेण्यात मदत होईल. मुंबईसाठी जल वाहतूक महत्त्वाची आहे. रो-रो सेवेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. गेटवे ऑफ इंडिया ते नवी मुंबई विमानतळ दरम्यान ‘वॉटर टॅक्सी’ सेवा लवकरच सुरू केली जाणार आहे. इलेक्ट्रिक बोटींचा ताफा आणला जात आहे, ज्यामुळे जलवाहतूक पर्यावरणपूरक बनेल, असे फडणवीस म्हणाले.

वाढवणसारखे मोठे बंदर उभारण्यात येत असून त्यामुळे महाराष्ट्र देशाच्या सागरी क्षेत्रात नेतृत्व करेल. वाढवण बंदर राज्यातील महत्त्वाच्या शहरांशी रस्ते मार्गे जोडले जाणार आहे. वाढवण बंदराचा फायदा संपूर्ण राज्याच्या विकासासाठी होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. आजच्या करारांमुळे महाराष्ट्रातील सागरी क्षेत्राला जागतिक स्तरावर नवे बळ मिळाले असून सागरी वाहतूक क्षेत्रात गुंतवणुकीचा नवा अध्याय सुरू झाला आहे, असे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

५५ हजार कोटींचे सामंजस्य करार

दिघी बंदर विकासासाठी अदानी पोर्ट्स बरोबर ४२ हजार ५०० कोटी, जयगड आणि धरमतर बंदर विस्तारासाठी जेएसडब्ल्यू बरोबर ₹३ हजार ७०९ कोटी, जहाज बांधणी क्षेत्रात चौगुले कंपनीबरोबर ₹५ हजार कोटी, जहाज दुरुस्तीमध्ये सिनर्जी शिपबिल्डर्स बरोबर १ हजार कोटी, जहाज पुनर्वापर क्षेत्रासाठी गोवा शिपयार्डसोबत २ हजार कोटी, असे एकुण ५५ हजार ९६९ कोटींचे १५ करार करण्यात आले.