मुंबई : मुंबई शहरात ड्रोन उडविण्यावर बंदी असताना, परवानगीशिवाय ड्रोन उडविल्याप्रकरणी पवई पोलिसांनी २३ वर्षीय तरूणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरक्षा उपाययोजना अधिक कडक करण्यात आल्या आहेत. पवई येथे ड्रोन दिसल्याची तक्रारी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाकडे आली होती. त्यानंतर शोध घेतला असता आरोपी तरूणाने ड्रोन उडवल्याचे निष्पन्न झाले. अखेर याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई केली.

मुंबईत सुरक्षेच्यादृष्टीने परवानगी शिवाय ड्रोन उडवण्याला बंदी आहे. तसेच ऑपरेशन सिंदूरनंतर पोलिसांनी परवानगीशिवाय फटाके व रॉकेट उडवण्यावरही बंदी घातली आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १२ मे रोजी मध्यरात्री १२:३० वाजता कंट्रोल रूमला दूरध्वनी आला होता. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने पवईमधील साकी विहार रोडवरील सोलारिस परिसरात एक ड्रोन कोसळले असल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सर्व यंत्रणा सतर्क झाल्या. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीकडून माहिती घेतली. प्राथमिक तपासात असे निष्पन्न झाले की हा ड्रोन अंकित ठाकूर या २३ वर्षीय तरूणाने उडवला होता. तो मूळचा हैदराबादचा असून सध्या पवईत राहतो. पवई पोलिसांनी ड्रोनची पाहणी केली. काहीही संशयास्पद आढळले नाही. त्यानंतर पोलिसांनी ड्रोनसह तरूणाला ताब्यात घेतले व चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले. चौकशीत अंकितने सांगितले की, त्याने हा ड्रोन एक वर्षापूर्वी खरेदी केला होता, पण तो काही काळ नादुरुस्त होता. अलीकडेच त्याने ड्रोन दुरुस्त करून घेतला आणि चाचणी म्हणून उडवला. ड्रोन उडवण्यासाठी त्याने कोणत्याही अधिकाऱ्यांकडून परवानगी घेतलेली नव्हती, असेही त्याने कबुल केले. त्यामुळे मुंबई पोलिस आयुक्तांनी जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तरूणाविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणावरून पवई पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ अंतर्गत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्वत्र कडेकोट बंदोबस्त

ऑपरेशन सिंदूरनंतर मुंबईत सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सरकारी आस्थापना, संवेदशिल ठिकाणे व धार्मिक स्थळे, परदेशी वकिलाती व रेल्वे स्थानकांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. संवेदनशील ठिकाणी बॉम्ब शोधक व नाशक पथकामार्फत तपासणी करण्यात येत आहे. रेल्वे पोलिसांनी मुंबईतील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर घातपात विरोधी तपासणी करण्यात येत आहे. त्यात चर्चगेट, सीएसएमटी, लोकमान्य टिळक टर्मिनस, कुर्ला, मुंबई सेंट्रल, अंधेरी, चेंबूर, गोवंडी, बोरीवली या रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. यावेळी पोलिसांनी ठिकठिकाणी रुटमार्च केला होता. यावेळी रेल्वे स्थानकांवरील पुल, फलाट, अडगळीची ठिकाणे, संशयीत व्यक्ती व बॅगांची तपासणी केली. विशेष करून लांब पल्ल्यांच्या वाहनांची सुरक्षा तपासणी करण्यात आली. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत फटाके वाजवू नयेत, तसेच रॉकेट उडवून नये, असे आदेश मुंबई पोलिसांनी जारी केले आहेत. उपायुक्त(अभियान) अकबर पठाण यांनी याबाबतचे आदेश जारी केले असून ही बंदी ११ मे पासून ९ जूनपर्यंत आहे. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १० मधील पोटकलम २ अंतर्गत मिळालेल्या अधिकारांतर्गत उपायुक्तांनी हे आदेश जारी केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना सर्व पोलिसांना देण्यात आल्या आहेत. तसेच परवानगीशिवाय ड्रोन उडवण्याला यापूर्वीही बंदी घालण्यात आली होती.