मुंबई : मधुमेह हा पूर्वी फक्त प्रौढांचा आजार मानला जात होता, परंतु आता हा आजार लहान मुलांच्या आरोग्यावरही गालबोट लावत असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च–इंडिया डायबिटीज (आयसीएमआर – आयएनडीआएबी) २०२३ च्या अहवालानुसार, भारतात वीस वर्षांखालील तब्बल अडीच लाखाहून अधिक मुले व तरुण टाइप-१ मधुमेहाने ग्रस्त आहेत. त्याहून चिंतेची बाब म्हणजे, दरवर्षी १५ ते १८ हजार नवीन बालरुग्णांची या यादीत भर पडत आहे. दुसरीकडे टाइप-२ मधुमेहाचे बालरुग्णही वाढताना दिसत असून याला अटकाव करण्यासाठी पालकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, टाइप-१ मधुमेह हा इन्सुलिन निर्मिती पूर्णपणे बंद झाल्यामुळे होतो. हा प्रकार प्रामुख्याने १ ते १४ वयोगटातील मुलांमध्ये दिसून येतो. या वयोगटातील मुलांना रोज इंजेक्शनद्वारे इन्सुलिन घ्यावे लागते आणि रक्तातील साखरेची पातळी सतत तपासावी लागते. इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशन (आयडीएप) च्या आकडेवारीनुसार, जगातील टाइप-१ मधुमेह असलेल्या मुलांपैकी तब्बल १२ टक्के मुले भारतातील आहेत. यामुळे भारताला “जगातील बालमधुमेहाची राजधानी” मानले जाऊ लागले आहे. तसे पाहिले तर भारतात मधुमेह सर्व वयोगटात झपाट्याने वाढत असून भारत ही मधुमेहाची जागतिक राजधानी बनण्याच्या मार्गावर आहे.
लठ्ठपणा, कमी शारीरिक हालचाल आणि अस्वास्थ्यकर आहारामुळे आज टाइप-२ मधुमेहाचे प्रमाण किशोरवयीन मुलांमध्येही धोकादायक वेगाने वाढत आहे. मुंबई, दिल्ली, पुणे, चेन्नईसारख्या शहरी भागांत १० ते १७ वयोगटातील मुलांमध्ये टाइप-२ मधुमेहाचे प्रमाण गेल्या १० वर्षांत जवळपास दुप्पट झाले, असे ‘जर्नल ऑफ पीडियाट्रिक एंडोक्रायनोलॉजी अँड मेटाबॉलिझम’ (२०२२) च्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्रातही प्रामुख्याने शहरी भागात लहान मुले व किशोरवयीन मुलांमध्ये झपाट्याने मधुमेह वाढताना दिसत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या (एनएचएम) २०२४ च्या आकडेवारीनुसार, फक्त महाराष्ट्रातच १८ वर्षांखालील १४,००० हून अधिक मुले मधुमेह व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत नोंदली गेली आहेत. ग्रामीण भागात उशिरा निदान होणे, तपासणी सुविधा अपुरी असणे आणि जागरूकतेचा अभाव यामुळे लहान मुलांमध्ये मूत्रपिंड निकामी होणे, डोळ्यांचे आजार आणि इतर गुंतागुंत वाढण्याचे प्रमाण जास्त असल्याचे आरोग्य विभागाचे डॉक्टर सांगतात.
इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स व डायबिटीज
या संस्थांच्या मते, बालमधुमेहाचे प्रमाण आटोक्यात आणायचे असेल तर शाळांमध्ये नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आहाराविषयी मार्गदर्शन,मुलांमध्ये खेळ व व्यायामाला प्रोत्साहन ही पावले तातडीने उचलणे आवश्यक आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने टाइप-१ मधुमेह असलेल्या मुलांना मोफत इन्सुलिन, तसेच डिजिटल ग्लुकोज मॉनिटरिंग उपकरणे उपलब्ध करून देण्याबाबत धोरणात्मक चर्चा सुरू असल्याची माहिती दिली आहे. तज्ज्ञांच्या मते, हे उपाय मुलांच्या जीवनमान सुधारण्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात.
मधुमेह ही केवळ साखरेची पातळी वाढण्याची समस्या नाही, तर ती आयुष्यभर व्यवस्थापनाची गरज असलेला गंभीर आजार आहे. बालमधुमेहाचे प्रमाण कमी करण्यासाठी पालक, शाळा आणि आरोग्यव्यवस्था तिन्हींचा सक्रिय सहभाग अनिवार्य असल्याचे लीलावती रुग्णालयातील विख्यात डायबिटीस व एन्डोक्रोनॉलॉजिस्ट डॉ शशांक जोशी यांनी सांगितले. गेल्या दोन दशकात टाइप-२ च्या मधुमेहाचे प्रमाण वाढत चलल्याचे दिसून येते. प्रामुख्याने लहान मुलांमधील खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी तसेच बैठे काम, संगणक व मोबाईलच्या अतीवापरामुळे मैदानी खेळाकडे तसेच व्यायामाकडे होणारे दुर्लक्ष हे प्रामुख्याने कारणीभूत असल्याचे डॉ जोशी म्हणाले.
शरीरातील प्रत्येक पेशीला ऊर्जा लागते व ती ग्लुकोजमुळे मिळत असते. मात्र यासाठी जी किल्ली असते ती इन्शुलीन असते. ही किल्ली ग्लुकोजचे गेट उघडते, हे लक्षात घेतल्यास जीवनशैलीतील सुयोग्य बदल हे किती महत्त्वाचे आहे ते लक्षात येईल. लहान मुलांच्या बाबतीत पालकांनी अधिक जागरुक राहून मुले जंक फूड खाणार नाहीत तसेच मैदानी खेळ व व्यायाम करतील याकडे लक्ष दिल्यास टाईप-२ मधुमेहाला अटकाव करता येऊ शकतो, असेही डॉ शशांक जोशी यांनी सांगितले.