मुंबई : देशात जुलैअखेर एकूण साखर उत्पादन २५८.२० लाख टनांवर गेले आहे. गत वर्षी याच काळात ३१६.३५ लाख टन उत्पादन झाले होते. गतवर्षाच्या तुलनेत उत्पादन १८.३८ टक्क्यांनी म्हणजेच ५८.२० लाख टनांनी घटले आहे. कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यांत जून ते सप्टेंबर या काळात अतिरिक्त गाळप हंगाम चालू राहून सप्टेंबरअखेर एकूण साखर उत्पादन २६१ लाख टनांवर जाण्याचा अंदाज आहे.
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने दिलेल्या माहितीनुसार, प्रामुख्याने गाळपासाठी उसाची उपलब्धता कमी असल्यामुळे साखर उत्पादनात ५८ लाख टनांनी घट झाली आहे. देशात जुलैअखेर एकूण साखर उत्पादन २५८.२० लाख टनांवर गेले आहे. गत वर्षी ३१६.३५ लाख टन उत्पादन झाले होते. कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यांत जून ते सप्टेंबर या काळात अतिरिक्त गाळप हंगाम सुरू असतो. या हंगामात कर्नाटकातील सात आणि तामिळनाडूतील नऊ कारखाने सप्टेंबर अखेर गाळप करतील.
त्यामुळे देशाचे एकूण साखर उत्पादन सप्टेंबरअखेर २६१ लाख टनांवर जाण्याचा अंदाज आहे. साखर निर्यात कोटा घोषित झाल्यानंतर कारखान्यांतून विक्री होणाऱ्या साखरेच्या किमती प्रति क्विंटल ३,९०० रुपयांवर गेल्या होत्या, मे महिन्यात पुन्हा साखरेच्या दरात घसरण झाली होती. श्रावण महिन्यानंतर सणासुदीचा काळ सुरू होत असल्याने साखरेची मागणी वाढून, किमती स्थिर राहतील, असा अंदाज साखर उद्योगातून व्यक्त केला जात आहे.
साखर कारखान्यांतून इथेनॉल उत्पादनाला मर्यादा
केंद्र सरकारने २०३० पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दीष्ट निश्चित केले होते, ते पाच वर्षे अगोदरच साध्य झाले आहे. २०१४ मध्ये फक्त १.५ टक्के असलेल्या इथेनॉल मिश्रणावरून आज २० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. सध्या एकूण ११२६ कोटी लिटर झालेल्या इथेनॉल वाटपाच्या तुलनेत फक्त ३८ टक्के पुरवठा साखर -आधारित इथेनॉल निर्मितीतून झाला आहे, तर ६२ टक्के धान्य-आधारित स्त्रोतांमधून आला आहे. त्यामुळे साखर कारखान्यांमधून इथेनॉल निर्मितीला मर्यादा असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य सरकारने नुकतीच साखर कारखान्यांना धान्यांपासून इथेनॉल निर्मितीला परवानगी दिली आहे, त्याचा कारखान्यांसह इथेनॉल उत्पादनाला फायदा होण्याचा अंदाज आहे, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी दिली.
सकारात्मक निर्णय घेण्याची गरज
महाराष्ट्रासह कर्नाटकमध्ये ऊस लागवडीत वाढ झाल्यामुळे आगामी गळीत हंगामात देशाचे एकूण साखर उत्पादन ३५० लाख टनांवर जाण्याचा अंदाज आहे. दरडोई साखरेचा वापर दिवसोंदिवस कमी होत असल्यामुळे साखर निर्यात आणि इथेनॉल निर्मितीबाबत केंद्र सरकारने सकारात्मक निर्णय घेण्याची गरज आहे, असे मागणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केली.