मुंबई : देशातील साखर हंगामाला संथ सुरुवात झाली आहे. सरासरी ऑक्टोंबरपासून सुरू होणाऱ्या कारखान्यांची धुराडी यंदा नोव्हेंबरमध्ये पेटली आहेत. उसाची उपलब्धता चांगली असल्यामुळे देशात यंदाच्या हंगामात निव्वळ साखर उत्पादन ३५० लाख टनांपर्यंत जाण्याचा अंदाज राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने वर्तविला आहे.
उसाचा गाळप हंगाम देशात दरवर्षी सरासरी ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होतो. या वर्षी मोसमी पाऊस लांबला. ऑक्टोबरअखेर पर्यंत राज्यात पाऊस सुरू होता. त्यामुळे साखर हंगाम नोव्हेंबरपासून सुरू झाला. मोसमी पावसामुळे खरीप हंगामातील अन्य पिकांचे नुकसान झाले असले तरीही काही अपवाद वगळता उसाला फायदाच झाला आहे. त्यामुळे उसाचे वजन वाढण्याची शक्यता आहे.
हंगामाच्या पहिल्या पंधरवड्यात देशभरात ३५० कारखान्यांनी गाळप सुरू केले. या कारखान्यांनी सुमारे १२८ लाख टन उसाचे गाळप करून सरासरी ८.२ टक्के साखर उताऱ्याने सुमारे १०.५० लाख टन साखर उत्पादन केले आहे. गाळप हंगाम उशिराने सुरू झाला असला तरीही यंदा उसाची उपलब्धता चांगली आहे, थंडीही चांगली पडण्याची शक्यता असल्यामुळे हंगामात निव्वळ साखर उत्पादन ३५० लाख टनांपर्यंत होण्याचा अंदाज आहे. त्यापैकी महाराष्ट्रात १२५ लाख टन, उत्तर प्रदेशात ११० लाख टन आणि कर्नाटकात ७० लाख टन उत्पादनाचा अंदाज आहे. या शिवाय इथेनॉल उत्पादनासाठी ३५ लाख टन साखर वळविली जाईल, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने दिली आहे.
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ शेतकर्यांच्या हिताला प्राधान्य देतो. शेतकर्यांच्या उसाला मिळणार्या एफआरपीमध्ये वाढ होणे, त्याला ऊसाची उच्च किंमत मिळणे हे तार्किकदृष्ट्या योग्य आहे आणि आम्ही शेतकरी केंद्रित संघटना म्हणून त्याचे पूर्णपणे समर्थन करतो. परंतु त्याच बरोबर कच्च्या मालाच्या उसाच्या वाढत्या किमती लक्षात घेता साखरेची एमएसपी वाढविणे आणि वाढीव इथेनॉल खरेदी किंमतीत वाढ होणे हे तार्किकदृष्ट्या सुसंगत व न्याय आहे.
साखर निर्यातीचे धोरणांत सातत्याची गरज
संपूर्ण भारतात उसाखालील क्षेत्र ५५ – ५७ लाख हेक्टरवर स्थिरावले आहे. भारत जगात दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक आणि सर्वात मोठा साखर ग्राहक आहे. त्यामुळे मर्यादित क्षेत्रातून कमी खर्चात अधिक ऊस उत्पादन करण्याची गरज आहे. त्यामुळे साखरेच्या किमान विक्री दरात वाढ करणे. इथेनॉलच्या खरेदी दरात वाढ करणे आणि साखर निर्यातीचे धोरणांत सातत्य ठेवण्याची गरज आहे, असे मत राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
