मुंबई : कांदिवली पश्चिमेकडील चारकोप येथे मे. इंडियन ग्लोबल स्टोर कंपनीकडून परवान्याशिवाय औषध विक्री करण्यात येत असल्याचे आढळून आले. अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईमध्ये २ लाख ७७ हजार २२८ कोटी रुपये किमतीची आठ प्रकारची ॲलोपॅथीची औषधे जप्त केली. औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा, १९४० व नियम १९४५ अंतर्गत ॲलोपॅथी औषधांच्या विक्रीसाठी परवान्याची आवश्यकता असते. मात्र कांदिवलीतील चारकोप येथे असलेल्या मे. इंडियन ग्लोबल स्टोर पेढीच्या तपसाणीमध्ये औषध निरीक्षकांनी पेढीचे मालक दर्शना मेहता यांच्याकडे औषध विक्रीसंदर्भातील परवान्याबाबत विचारणा केली असता, त्यांच्याकडे कोणतेही परवाने नसल्याचे लक्षात आले.
त्यामुळे औषध निरीक्षकांनी कारवाई करून उपलब्ध औषध साठ्यातून चाचणीसाठी कायद्यानुसार औषधाचे नमूने घेतले. तसेच औषध व सौंदर्य प्रसाधन कायदा १९४० च्या कलम १८(क) चे उल्लंघन केल्याप्रकरणी उर्वरित २ लाख ७७ हजार २२८ रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. तसेच औषध निरीक्षकांनी औषध विक्री व खरेदी बिलांची प्रत पुढील तपासासाठी आपल्या ताब्यात घेतल्या आहेत.
अन्न व औषध प्रशासनाच्या मुंबई विभागातील औषध निरीक्षक आरती कांबळी व अजय माहुले यांनी ही कारवाई केली. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त राजेश नार्वेकर, सहआयुक्त (दक्षता) डॉ. राहुल खाडे व सह आयुक्त विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. तसेच सहायक आयुक्त (गुप्तवार्ता) मुंबई वि. आर. रवि व सहायक आयुक्त डी. एस. सिद यांनी कारवाई यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.