मुंबई : भारतीय नौदलात ‘आयएनएस हिमगिरी’ आणि ‘आयएनएस उदयगिरी’ या दोन नवीन युद्धनौका अलीकडेच दाखल झाल्या. त्यापैकी ‘आयएनएस उदयगिरी’ युद्धनौकेवर लावण्यात आलेल्या चित्रांमध्ये सुलेखनकार रुपाली संदीप ठोंबरे यांच्या ४ अक्षरचित्रांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांनी ‘उदयगिरी’ या नावाला समर्पक अशा कलाक़ृती साकारताना शास्त्रीय, अधिकृत आणि पुरातन अशा विविध २१ भारतीय लिपींचा कलात्मकतेने वापर केला आहे.
मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी येथे भरलेल्या ‘अक्षरभारती’ या सुलेखन प्रदर्शनाला नौदलातील काही अधिकाऱ्यांनी भेट दिली होती, तेव्हा रुपाली ठोंबरे यांच्या अक्षर चित्रांनी त्यांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर रुपाली यांना ‘आयएनएस उदयगिरी’साठी चित्रे काढण्याची संधी दिल्यानंतर अक्षरकलाकृती युद्धनौकेवर झळकत आहेत. ‘माझ्यासाठी अभिमानाचा व अविस्मरणीय क्षण आहे. यानिमित्ताने देशासाठी काम करण्याची संधी मिळाली, या गोष्टीचा प्रचंड आनंद आहे. लिपींचा वापर अशा पद्धतीने केल्यास भारतीय लिपींचे सुंदर रूप संपूर्ण जगासमोर येईल’, असे रुपाली ठोंबरे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
रुपाली ठोंबरे यांनी रंग आणि अक्षरांचा अचूक मेळ साधला असून प्रत्येक चित्रातून देशातील विविधतेतून एकता जपण्याचा प्रयत्न केला आहे. रुपाली यांनी जगप्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले असून देशात तसेच परदेशात त्यांनी रेखाटलेल्या चित्रांची प्रदर्शने भरली आहेत.