मुंबई : भारतीय परिचारिका परिषदेकडून परिचारिका अभ्यासक्रमाच्या संस्थास्तरीय फेरीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. या फेरीसाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) नव्याने नाेंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. परिचारिका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या, मात्र नोंदणी करता न केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध होणार आहे. संस्थास्तरीय फेरीचे सीईटी कक्षाकडून नव्याने वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, त्यानुसार विद्यार्थ्यांना ५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याची संधी उपलब्ध करण्यात आली आहे.
परिचारिका अभ्यासक्रमाची संस्थास्तरीय फेरी ३१ ऑक्टोबर रोजी संपुष्टात येत आहे. मात्र त्यानंतरही अनेक परिचारिका अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांमध्ये जागा रिक्त राहण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या महाविद्यालयांनी भारतीय परिचर्या परिषदेकडे आणि सीईटी कक्षाकडे प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. या शैक्षणिक संस्थांच्या निवेदनाची दखल घेऊन भारतीय परिचर्या परिषदेने परिचारिका अभ्यासक्रमाला मुदतवाढ देण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच नुकत्याच पार पडलेल्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमध्ये (कॅप) नोंदणी करणे शक्य न झालेल्या विद्यार्थ्यांना या फेरीमध्ये नोंदणी करण्याची परवानगी देण्याचे निर्देश सीईटी कक्षाला दिले आहेत. त्यानुसार सीईटी कक्षाने नव्या संस्थास्तरीय फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
नव्या वेळापत्रकानुसार परिचारिका अभ्यासक्रमाची सीईटी दिलेल्या मात्र नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांना ५ नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे. तसेच या विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे व प्रवेश शुल्क ५ नोव्हेंबर रोजी रात्री ११.५९ पर्यंत भरता येणार आहे. नव्याने नोंदणी झालेले व अद्यापपर्यंत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांची ६ नोव्हेंबर रोजी एकत्रित गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. या टप्प्यात नोंदणी करणारे विद्यार्थी संस्थास्तरीय फेरीसाठी पात्र ठरणार असून, यापूर्वी काही विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली नाही. अशा विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन सीईटी कक्षाकडून करण्यात आले आहे.
