मुंबई : जोगेश्वरी येथील एका पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापकाने सव्वा कोटी रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. पेट्रोल पंपाच्या बॅंक खात्यातील, तसेच दररोज जमा होणारी रोकड त्याने परस्पर आपल्या आणि मित्राच्या बॅंक खात्यात वळती केली. याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी बडतर्फ व्यवस्थापक महेंद्र जोशी याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार कुणाल छेडा यांचा जोगेश्वरी पश्चिम येथील आदर्श नगरमध्ये इंडियन ऑइल कंपनीचा पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपावर महेंद्र जोशी (४२) सहाय्यक व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता. त्याच्यावर आर्थिक व्यवहारांची जबाबदारी होती. तो २०१९ पासून पेट्रोल पंपावर काम करीत होता.

लेखा परीक्षणात गैरव्यवहार उघडकीस

मालक कुणाल छेडा यांनी जानेवारी २०२५ मध्ये केविन गाडा यांची लेखापाल म्हणून नियुक्ती केली. गाडा यांनी जुन्या आर्थिक नोंदीची तपासणी केली असता, एप्रिल २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या काळात पेट्रोल आणि डिझेल विक्रीतून मिळालेली रक्कम जोशी आणि त्याचा मित्र संजय बागल यांच्या खात्यात वळवण्यात आल्याचे उघड झाले.

अंतर्गत चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार ८३ लाख ७० हजार रुपये पेट्रोल पंपाच्या एचडीएफसी, पंजाब नॅशनल आणि आयसीआयसीआय बँकेच्या खात्यांतून थेट जोशी आणि बागलच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले होते. याशिवाय, दररोजच्या रोख व्यवहारांतून आणखी ३६ लाख ३४ हजार रुपयांचा अपहार करण्यात आला होता.

पेट्रोल पंपाचे मालक कुणाल छेडा यांनी या गैरव्यवहाराबाबत जोशी याला विचारणा केली असता त्याने माफी मागून आपली चूक कबूल केली. ही रक्कम शेअर बाजारात गुंतवल्याचे त्याने सांगितले. परंतु ३ महिन्यांत गावची मालमत्ता विकून सर्व रक्कम परत करण्याचे आश्वासन त्याने दिले. दरम्यान, छेडा यांनी जोशीला कामावरून काढून टाकले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र, जून २०२५ पर्यंत त्यांनी रक्कम परत केली नव्हती. त्यामुळे पेट्रोल पंपाचे पर्यवेक्षक भव्येश मरू (४८) यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात जोशीविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी महेंद्र जोशी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.