लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : आशिया खंडातील सर्वात पहिली रेल्वे १६ एप्रिल १८५३ रोजी बोरीबंदर (सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) येथून ठाण्यापर्यंत धावली. या घटनेला १७१ वर्षे पूर्ण झाली असून, भारतीय रेल्वेचे जाळे यशस्वीपणे विस्तृत होत आहे.

एप्रिल १८५३ मधील पहिल्या रेल्वेपासून ते आधुनिक वंदे भारत रेल्वे गाड्यांपर्यंतचा भारतीय रेल्वेचा प्रवास झाला आहे. या कालावधीदरम्यान पहिली शताब्दी एक्स्प्रेस, पहिली जनशताब्दी एक्स्प्रेस, पहिली तेजस एक्स्प्रेस व पंजाब मेल सारख्या काही जुन्या गाड्या १०० वर्षांनंतरही धावत असून प्रवाशांचा प्रतिसाद कायम वाढत आहे. पहिली रेल्वेगाडी चालवणारी ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे १९०० मध्ये इंडियन मिडलँड रेल्वे कंपनीत विलीन झाली.

आणखी वाचा-वृद्धांच्या आरोग्याच्या हमीचा ‘जाहीरनामा’ कोण देणार?

या कंपनीच्या सीमा उत्तरेला दिल्ली, ईशान्यकडे कानपूर व अलाहाबाद तसेच पूर्वेकडे नागपूर ते आग्नेयकडे रायचूरपर्यंत विस्तारल्या. ५ नोव्हेंबर १९५१ रोजी निजाम संस्थान, सिंधिया संस्थान आणि ढोलपूर संस्थानातील रेल्वे यांचे एकत्रीकरण करून मध्य रेल्वेची स्थापना करण्यात आली. सध्या मुंबई, भुसावळ, नागपूर, सोलापूर आणि पुणे या पाच विभागांसह मध्य रेल्वे ही महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यांमध्ये ४,२७५ मार्ग किमी पेक्षा जास्त अंतरावर पसरली असून या राज्यांमधील तब्बल ४६६ स्थानकांवर मध्य रेल्वे सेवा प्रदान करते.

नेरळ-माथेरान मिनी ट्रेनला ११७ वर्षे पूर्ण

नेरळ-माथेरान रेल्वेचे बांधकाम १९०४ मध्ये सुरू होऊन दोन फूटी गेज मार्गिका १९०७ रोजी वाहतुकीसाठी खुली झाली. पावसाळ्यात सुरक्षेच्या कारणास्तव ही मार्गिका बंद केली जात होती. मात्र २९ सप्टेंबर २०२१ रोजीपासून पावसाळ्यात अमन लॉज ते माथेरान दरम्यान शटल सेवा सुरू करण्यात आली.