मुंबई : इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) द्वारे सोलापूर आणि मडगाव येथून भारत गौरव पर्यटन ट्रेनद्वारे ‘अष्ट ज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रा’ सुरू करण्यात येणार आहे. ही यात्रा पर्यटकांच्या खिशाला परवडणारी असून त्यात आरामदायी सेवा मिळणार आहे.

भारतातील प्रमुख ज्योतिर्लिंग व इतर लोकप्रिय पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी आयआरसीटीसीने नवीन सहलीचे आयोजन केले आहे. माफक दरात आरामदायी रेल्वे प्रवासाची हमी देते. आयआरसीटीसीच्या पश्चिम विभाग मुंबई कार्यालयाने १९ जुलै २०२५ रोजी सोलापूरहून ही अष्ट ज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रा सुरू होणार आहे.

भारत गौरव रेल्वेगाड्यांमध्ये विनावातानुकूलित शयनयान, तृतीय श्रेणी वातानुकूलित डबा, द्वितीय श्रेणी वातानुकूलित डबा असेल. तसेच प्रवासी व पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी रेल्वेगाडीच्या बाहेरील बाजूस भारतीय स्मारके, शिल्प, नृत्य प्रकार रेखाटून ती सजवण्यात आली आहे. या रेल्वेगाडीमध्ये सुमारे ६०० ते ७०० पर्यटक बसू शकतील, एवढी क्षमता असेल. यासह रेल्वेगाडीत उद्घोषणा, सीसीटीव्ही कॅमेरे, सुसज्ज पेंट्री कार आहे, असे आयआरसीटीसीद्वारे सांगण्यात आले.

या सहलीची प्रति व्यक्ती किंमत २२,८२० रुपयांपासून आहे. तर, ५ ऑगस्ट २०२५ रोजी मडगाववरून सुरू होणाऱ्या सहलीसाठी प्रति व्यक्ती २३,८८० रुपयांपासून शुल्क सुरू होत आहे. हा दौरा अतिशय चांगल्या प्रकारे नियोजित केला असून किफायतशीर आणि सर्वसमावेशक आहे, असा दावा आयआरसीटीसीने केला आहे. तिकिटाच्या किंमतीत रेल्वेच्या आरक्षित तिकिटासह राहण्याची सोय, जेवण, प्रवेश शुल्क, सहल मार्गदर्शक (टूर गाईड), पर्यटनस्थळी पर्यटकांना ने-आण करण्यासाठी बसची सुविधा, प्रवासी विमा आणि जीएसजी यांचा समावेश आहे.

पर्यटकांचा प्रवास अधिक सोयीस्कर आनंददायी बनवणे आहे, हे आमचे ध्येय आहे. जेणेकरून पर्यटकांना सहलीचा अनुभव कायम स्मरणात राहिला पाहिजे. या सहलीत अनेक सुविधा असल्याने पर्यटकांचा प्रवास आरामदायी होईल. त्याचबरोबर खिशाला परवडणारा हा दौरा असल्याने, मध्यमवर्गीय नागरिक देखील या सहलीचा आनंद घेऊ शकतात. पर्यटकांना श्रावणात भारतातील उत्कृष्ट आणि लोकप्रिय स्थळांना भेटी देण्यासाठी एक संधी मिळाली आहे, असे आयआरसीटीसीच्या पश्चिम विभागाचे समुह महाव्यवस्थापक गौरव झा यांनी सांगितले.

आयआरसीटीसीच्या प्रत्येक सहलीची आणि दौऱ्याची माहिती, त्याचे तपशील, किंमत आणि आरक्षण प्रक्रियेची सविस्तर माहिती आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासह आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर अष्ट ज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्राचे आरक्षण करता येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.