मुंबई : ‘आभासी कैद’ अर्थात ‘डिजिटल अरेस्ट’ या सायबर फसणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातील उच्चपदस्थ लोकं या फसवणुकीला बळी पडत असतात. मात्र प्रथमच अमेरिकेत राहणारी ३३ वर्षीय तरुणी ‘डिजिटल अरेस्ट’च्या जाळ्यात फसली आहे. भारतातील सायबर भामट्यांनी तिला मनी लॉंड्रींगच्या गुन्ह्यात अटक करण्याची धमकी देऊन ९४ हजार अमेरिक डॉलर म्हणजे भारतीय चलनातील सुमारे ८४ लाख रुपये लंपास केले.
३३ वर्षीय तक्रारदार तरूणी ही बोरीवलीत राहते. ती सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करते. मागील ७ वर्षांपासून ती अमेरिकेच्या न्यू जर्सी शहरात नोकरी करते. तिच्या मनी लॉंड्रींगच्या गुन्ह्यात अटक करण्याची धमकी देत आभासी कैदेत ठेवण्यात आले होते.
अशी केली फसवणूक
मागील आठवड्यात या तरुणीला एका दूरध्वनी आला होता. तुमच्या क्रेडीट कार्डाचा वापर करून बंदूक विकत घेण्यात आली आहे, असे सांगण्यात आले. मात्र हा फसवणूकीचा प्रकार असल्याचे वाटून तिने तो मोबाईल क्रमांक ब्लॉक केला होता. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी भारतातील मोबाईल क्रमांकावरून दूरध्वनी आला. दिल्ली सायबर क्राईम मधून बोलतोय असे फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितले. नरेश गोयल यांनी केलेल्या २.५८ मिलियनच्या घोटाळ्यात नाव असल्याचे तिला सांगण्यात सांगितले. मनी लॉंड्रींगचा गुन्हा दाखल करून अटक केली जाईल अशी धमकी दिली. त्यानंतर सायबर भामट्याने व्हिडियो कॉल करून नकली पोलीस ठाण्याचा देखावा तयार केला होता. त्यामुळे खरंच दिल्ली गुन्हे शाखेचे पोलीस असतील असे तिला वाटले होते.
८४ लाख कूटचलनातून घेतले
आरोपींनी मग या तरुणीला जाळ्यात ओढायला सुरवात केली. तिला व्हिडिओ कॉल करून ‘डिजिटल अरेस्ट’ केल्याचे सांगितले. तिला एक दुसरा मोबाईल आणि सिम कार्ड घ्यायला सांगितले. तिच्याकडून बॅंकेचे सगळे तपशील काढून घेतले. त्यानंतर तिला बीट कॉईन, कूट चलन (क्रिप्टो करन्सी) मध्ये खाते उघडायला सांगितले. या प्रकरणातून सुटका करण्याचे आश्वासन दिले. यासाठी आरोपींनी एक ‘विशेष खाते’ असल्याचे सांगून त्यात पैसे भरण्यास सांगितले. चार वेगवेगळ्या व्यवहारात तिने क्रिप्टो करन्सी मधून ९४ हजार अमेरिकी डॉलर्स (भारतीय चलनातील ८४ लाख रुपये) भरले. हे पैसे नंतर परत मिळतील असेही सांगितले होते. मात्र ते पैसे तिला मिळाले नाहीत.
गुन्हा दाखल करण्यात अडचणी
याबाबत फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले. तिने न्यू जर्सीच्या सायबर पोलिसांकडे तक्रार केली. मात्र व्यवहार भारतीय खात्यात झाल्याचे कारण देत त्यांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. तिने बोरीवलीत राहणार्या आपल्या कुटुंबिय आणि मित्रांशी संपर्क केला. आम्ही आता मुंबईत सायबर पोलिसांची मदत घेणार आहोत, असे या तरूणीच्या मित्राने सांगितले.
