कोटय़वधी रुपयांचे नुकसान, ‘कॅग’चा ठपका
मुंबई : नवी मुंबई विमानतळ उभारणी तसेच मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. या दोन्ही प्रकल्पांच्या विविध १६ कामांसाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत सिडकोने मर्जीतील कंपन्यांवर मेहेरनजर दाखविल्यामुळे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले आहे. एवढेच नव्हे तर काही कामांमध्ये तर निविदा न काढताच कोटय़वधींच्या कामाची खिरापत वाटल्याचाही ठपका भारताचे नियंत्रण व महालेखापरीक्षकानी (कॅग) ठेवला आहे.
देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात सिडकोत झालेला हा गैरव्यवहार उघडकीस आणणारा कॅगचा अहवाल विधिमंडळ अधिवेशनात जाहीर करून सरकारने विरोधकांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला असला तरी सिडको स्वायत्त असून त्यांची कोणतीही नस्ती मान्यतेसाठी मुख्यमंत्र्याकडे येत नसल्याचे सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हात झटकले आहेत.
नवी मुंबई विमानतळ तसेच नवी मुंबई मेट्रो रेल प्रकल्पाच्या अंमलबजावणीत सिडकोने अनेक नियमांचे उल्लंघन केले असून त्यामुळे मंडळास कोटय़वधी रुपयांचा फटका बसल्याचे अहवालात म्हटले आहे. ५० कोटीपेक्षा अधिक रकमेच्या कामाच्या निविदा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध करण्याची अट असतानाही सिडकोने या जाहिराती स्थानिक पातळीवर प्रसिद्ध केल्या. विमानतळाच्या जमीन विकासाच्या कामाची १५८१.११ कोटी रुपयांची कंत्राटे देण्यात आली. त्यात जीपीएल कंपनीस अंदाजित खर्चापेक्षा १८ टक्के तर सीएसजे- जीव्हीके कंपनीस अंदाजित खर्चापेक्षा २८.५० टक्के जादा दराने काम देण्यात आले. विशेष म्हणजे यात एका- एका कंपनीने निविदा भरली असतानाही पुन्हा निविदा न मागविता त्याच कंपन्यांना कामे देण्यात आल्याने स्पर्धात्मक निविदा झाल्या नसल्याचे अहवात म्हटले आहे.
अशाच प्रकारे कामाचा पुरेसा अनुभव व निविदेतील अटींची पूर्तता न करणाऱ्या कंस्ट्रक्टोरा सॅन जोस जीव्हीके प्रोजेक्टस आणि टेक्निकल सव्र्हिसेस प्रा.लि., डी.जी. बेल्हेकर अँड कंपनी, कल्पना स्ट्रक्ट-कॉन प्रा.लि. पी.डी अर्थमूव्हर्स, पी.पी. खारपाटील कंस्ट्रक्शन प्रा.लि आणि विशाल कन्स्ट्रक्शन या कंपन्यांना ८९० कोटी रुपयांची कामे देण्यात आली. यातील काही कंत्राटदारांना पात्र करण्यासाठी सिडकोने आपल्या कामाच्या तसेच निविदेतील अटी शर्तींमध्ये बदल केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
अनियमिततेशी संबंध नाही – फडणवीस
नवी मुंबई विमानतळाशी संबंधित काही कामांमध्ये निविदा प्रक्रियेत सिडकोकडून झालेल्या अनियमिततेशी आपला कोणताही थेट संबंध नाही आणि कॅगने आक्षेप घेतलेली अन्य प्रकरणे आधीच्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळातील आहेत, असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अहवालातील काही भाग उघड केल्याने (सिलेक्टिव्ह लीक) फडणवीस यांनी आश्चर्य व्यक्त केले.