मुंबई : सरकारच्या विविध विभागात गत अनेक वर्षांपासून लाखो पदे रिक्त आहेत. जून २०२५ पर्यंत २ लाख ९७ हजार ८५९ पदे रिक्त आहेत. ही पदे विकसित महाराष्ट्र, ई – गव्हर्नन्स विषयक सुधारणा आणि सेवा विषयक प्रशासकीय सुधारणा या तीन बाबींवर आधारित दीडशे दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रम संपल्यानंतर महाभरतीद्वारे ही रिक्त पदे भरली जातील, अशी घोषणा माहिती तंत्रज्ञानमंत्री आशिष शेलार यांनी दिली.
विक्रम काळे यांनी उपस्थित केलेल्या चर्चेला उत्तर देताना शेलार यांनी, प्रत्येक विभागाकडून रिक्त पदाची माहिती मागविण्यात आली आहे. अनेक विभागात आकृतीबंधाचे काम सुरू असल्याची माहिती दिली. १५ जून २०२५ पर्यंत सेवार्थ प्रणालीद्वारे ज्यांचा पगार निघतो, अशी २ लाख ९२ हजार २७० पदे रिक्त आहेत. त्यात सेवानिवृत्त होणाऱ्या ५,२८९ पदांचा समावेश केला तर २ लाख ९७ हजार ८५९ पदे रिकामा आहेत. सुमारे ३५.८३ पदे रिकामी आहेत. ९ जून २०२५ ला सेवा विषयक बाबींविषयक १५० दिवसांचा कार्यक्रम राबविण्यात आला आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक बाबी अद्ययावत व्हावे.
अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कामकाज कार्यक्षम रितीने व्हावे. पदभरती विहित कालमर्यादेत व्हावे, यासाठी मुख्यमंत्री सेवाकर्मी कार्यक्रम सुरू आहे. त्यामुळे १५० दिवसांनंतर राज्यात मेगा भरती होईल. दर शुक्रवारी सुधारित आकृतीबंधाचा आढावा घेतला जात आहे. त्यामुळे रिक्त पदाची नेमकी आकडेवारी समोर येईल. ‘अ’, ‘ब’, ‘क’ वर्गातील पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याची तरतूद नाही. त्यामुळे ड वर्गातील कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरली जातात. पण, ‘ड’ वर्गातील अनुकंपा तत्त्वाखालील पदे कंत्राटी पद्धतीने भरली जात नाहीत, असेही शेलार म्हणाले.
नागरिकांना आधिक चांगली सेवा देण्यासाठी हा दीडशे दिवसांचा कार्यक्रम आखला आहे. या कार्यक्रमातून शासकीय यंत्रणेत आणखी सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून भरती प्रक्रियेला गती देण्यात येईल, असेही शेलार यांनी सांगितले.