मुंबई : शहरातील विविध गृहसंकुलात ‘फुलपाखरु बाग’ उभारण्याचा उपक्रम पर्यावरण दक्षता मंडळाने हाती घेतला आहे. बिग बटरफ्लाय मंथच्या निमित्ताने हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात येत असून, यासाठी मंडळ गृहसंकुलांना रोपे उपलब्ध करणार आहे.
या बागेत लावण्यात येणाऱ्या रोपांमुळे फुलपाखरांना आवश्यक असलेले वातावरण तयार होणार असून, शहरात फुलपाखरांची संख्या वाढण्यास मदत होईल. या उपक्रमात गृहसंकुलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, फुलपाखरांना दोन प्रकारच्या वनस्पती लागतात. एक खाद्य वनस्पती तर, दुसरी पुष्परस वनस्पती. दरम्यान, मंडळाच्या नर्सरीमधून इच्छुकांना झाडांची रोपे देण्यात येणार आहेत.
गृहसंकुलातील एखादी जागा ठरवून तेथे ही रोपे लावण्यात येतील. या रोपांटी प्रामुख्याने ऊन येत असलेल्या ठिकाणी लागवड करावी लागते. याचबरोबर त्यांना दररोज पाणी घालण्याची आवश्यकता असते. खाद्य वनस्पती, तसेच पुष्परस वनस्पतीकडे फुलपाखरे आकर्षित होतात. याचबरोबर या झाडांवर रासायनिक औषधांची फवारणी करायची नसते. दरम्यान, यापूर्वीही या उपक्रमांतर्गत मंडळाने अनेक गृहसंकुलात फुलपाखरू बाग उभारली आहे.
फुलपाखरू उद्यानातील रोप
कुफिया, बोगनवेल, हळदी कुंकू, पानफुटी, तगर, जंगली अबोली, स्ट्रेचिटरफेरा, अडुळसा, निर्गुडी, कदंब, दिंड्या, आंबा, बेल, आपटा, उंबर, कडीपत्ता, बहावा.
खाद्य वनस्पती आणि फुलपाखरे
– पानफुटी- रेड पिअरो
– कृष्णकमळ- टोनी कॉस्टर
– रुई- प्लेन टायगर
– कडीपत्ता- लाइम बटरफ्लाय
बिग बटरफ्लाय मंथ
दरवर्षी १ ते ३० सप्टेंबर या कालावधीत देशभरात बिग बटरफ्लाय मंथ म्हणून साजरा केला जातो. या काळात नागरिक, विद्यार्थी, निसर्गप्रेमी आणि स्वयंसेवी संस्था मिळून फुलपाखरांचे निरीक्षण व नोंदी करतात.फुलपाखरांची जैवविविधता जपणे, सामान्य नागरिकांना फुलपाखरांचे पर्यावरणातील महत्त्व समजावून सांगणे हा यामागील उद्देश आहे. हा राष्ट्रीय पातळीवरील उपक्रम असून नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्स, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि इंडियन फाउंडेशन फॉर बटरफ्लाय यासारख्या संस्थासह अनेक पर्यावरण संस्था यात सहभागी होतात. महाराष्ट्रासह देशभरातील विविध संस्था त्यात सक्रिय भाग घेतात.