मुंबई : मुंबई विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रमांची येत्या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अनुषंगाने चारही विद्याशाखांमध्ये गुणवत्ता आणि संशोधनावर आधारित अभ्यासक्रमांची रचना करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपारिक अभ्यासक्रमांसह नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची पसंती दिसत आहे. कालपरत्वे बदलत्या गरजा आणि उद्योन्मुख क्षेत्रातील संधीचे नवीन दालन लक्षात घेता विद्यापीठाने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), विदा विश्लेषण (डेटा अॅनालिटिक्स), सायबर सुरक्षा, क्लाऊड कम्प्युटिंगसह विविध नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरु केले आहेत. तसेच मंदिर व्यवस्थापनाचाही पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे
मुंबई विद्यापीठातर्फे उद्योग, संशोधन आणि सामाजिक गरजा लक्षात घेऊनही विविध अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत. जागतिक दर्जाच्या प्रयोगशाळा, उपकरणे आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य अशा वैविध्यपूर्ण वातावरणात उच्च शिक्षणाच्या विविध संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धेसाठी सक्षम व्हायला मदत होणार आहे. सर्व अभ्यासक्रमांची पात्रता, प्रवेश प्रक्रिया आणि इतर तपशीलवार माहिती मुंबई विद्यापीठाच्या www.mu.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असून प्रवेशसाठी विद्यार्थ्यांनी https://mu.ac.in/admission या संकेतस्थळावर जाऊन ३ जूनपूर्वी नोंदणी करावी असे आवाहन मुंबई विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.
मुंबई विद्यापीठातील विद्याशाखानिहाय अभ्यासक्रम
• विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा :
एम.एस्सी. इन फायनान्स, जैवतंत्रज्ञान, जैवभौतिकशास्त्र , जीवनशास्त्र – मत्स्यपालन तंत्रज्ञान, जैवरसायनशास्त्र,पर्यावरण जैवतंत्रज्ञान, ऑरगॅनिक केमिस्ट्री (स्वायत्त), अॅनालिटिकल केमिस्ट्री (स्वायत्त), इनऑर्गॅनिक केमिस्ट्री (स्वायत्त), फिजिकल केमिस्ट्री (स्वायत्त), इंडस्ट्रियल पॉलिमर केमिस्ट्री (स्वायत्त), संगणकशास्त्र, विदाशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र (स्वायत्त), पर्यावरणशास्त्र , प्राणीशास्त्र – महासागरीय अभ्यास , सांख्यिकी, नॅनो सायन्स व नॅनो टेक्नॉलॉजी, मटेरियल सायन्स, विदा विश्लेषण, मरीन स्टडीज, कृत्रिम बुद्धिमत्ता, क्लाउड कम्प्युटिंग, ऑरगॅनिक, इनऑर्गॅनिक, अॅनालिटिकल आणि फिजिकल केमिस्ट्री, माहिती तंत्रज्ञान,भूगोल व जिओस्पेशल तंत्रज्ञान, एमटेक इन केमिकल इंजिनीअरिंग, संगणक अभियांत्रिकी, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सह पदवीसाठी एम.एस.इन डेटा अॅनालिटिक्स, सायबर सुरक्षा, केमिकल सायन्सेस या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
• मानव्यविज्ञान विद्याशाखा :
अरेबिक,आफ्रिकन स्टडीज, संज्ञापन व पत्रकारिता, जनसंपर्क, राज्यशास्त्र, सार्वजनिक धोरण, युरेशियन अभ्यास, अर्थशास्त्र (स्वायत्त), इंग्रजी अभ्यास, फ्रेंच, गुजराती, जर्मन (बी.ए./एम.ए. एकत्रित अभ्यासक्रम), हिंदी, इतिहास, कन्नड, भाषाशास्त्र, मराठी, मानसशास्त्र भूगोल व जिओस्पेशल तंत्रज्ञान, पर्शियन, तत्त्वज्ञान, पाली आणि बौद्ध अभ्यास, पाली – ५ वर्षांचा एकत्रित बी.ए. / एम.ए. अभ्यासक्रम, रशियन अभ्यास, सिंधी, समाजशास्त्र, संस्कृत, योगशास्त्र, अर्थशास्त्र (पारंपरिक व सांस्कृतिक दृष्टीने), पुराणे व महाकाव्ये, शुद्ध संस्कृत साहित्यातील अभ्यास, उर्दू, ग्रामीण विकास, पुरातत्वशास्त्र, अवेस्ता-पहलवी या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
• आंतरविद्याशाखीय अभ्यासशाखा :
पदव्युत्तर परफॉर्मिंग आर्ट्समध्ये हिंदुस्थानी शास्त्रीय गायन, लोककला, रंगभूमी (नाटक) एम.ए. इन डॉ. आंबेडकर स्टडीज, विकास अभ्यास, आंतरराष्ट्रीय संबंध व धोरण अभ्यास, नेतृत्व अध्ययन, हिंदू स्टडीज आणि कीर्तनशास्त्र तसेच एम.एस.डब्ल्यू.– सामाजिक कार्यातील पदव्युत्तर पदवी, ग्रंथालय व माहितीशास्त्रातील पदवी या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
• वाणिज्य व व्यवस्थापन अभ्यासशाखा :
एम.कॉम. व्यवसाय व्यवस्थापन, बँकिंग व फायनान्स, प्रगत लेखाशास्त्र या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
• पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम :
ब्लॉकचेन तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, कायदा व फॉरेन्सिक्स, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, आंतरराष्ट्रीय धोरण व रणनीती अभ्यास, मंदिर व्यवस्थापन, प्लेबॅक सिंगिंग अँड स्टेज परफॉर्मन्स अशा अभ्यासक्रमांचा समावेश आहे.