मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) ‘स्वामी समर्थ नगर – विक्रोळी मेट्रो ६’ मार्गिकेच्या कारशेडसाठी कांजूरमार्ग येथील १५ हेक्टर जागा उपलब्ध झाली असून कारशेडसाठी ही जागा अपुरी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे एमएमआरडीएने राज्य सरकारकडे कांजूरमार्ग येथील आणखी सात हेक्टर जागेची मागणी केली आहे.
‘मेट्रो ६’मधील कारशेड कांजूरमार्ग येथील १५ हेक्टर क्षेत्रफळाच्या भूखंडावर उभारण्याचे प्रस्तावित असून राज्य सरकारने या जागेला २०१६ मध्ये हिरवा कंदील दाखविला होता. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ची कारशेड आरे वसाहतीतून कांजूरमार्ग येथे हलविण्यात आली. त्यानंतर या जागेवरून मोठा वाद निर्माण झाला. हा वाद थेट न्यायालयापर्यंत गेला आणि वादात ‘मेट्रो ६’ची कारशेडही रखडली. पण आता ‘मेट्रो ६’च्या कारशेडच्या जागेचा प्रश्न निकाली निघाला आहे. राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी कारशेडसाठी कांजूरमार्ग येथील १५ हेक्टर जागा एमएमआरडीएच्या ताब्यात दिली असून ‘मेट्रो ६’च्या कारशेडच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. आता लवकरच कारशेडच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.
कारशेडसाठी मिळालेली जागा अपुरी असून एमएमआरडीएला आणखी सात हेक्टर जागेची आवश्यकता आहे. राज्य सरकारकडे आणखी सात हेक्टर जागेची मागणी करण्यात आल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. ‘एमएमआरडीए’ने ‘मेट्रो ६’साठी मेट्रोगाडय़ांच्या १०८ डब्यांच्या खरेदी करण्यासाठी नुकतीच निविदा मागविली आहे. डब्यांची आणि गाडय़ांची संख्या लक्षात घेता कारशेडसाठी आणखी जागेची आवश्यकता आहे.
काय घडले?
मेट्रो ६ ची प्रस्तावित कारशेड ज्या कांजूरमार्गच्या जागेवर आहे, त्याच कांजूरमार्गची ४१ हेक्टर जागा महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागितली होती. मेट्रो ६ सह ३, मेट्रो ४ आणि मेट्रो १४ चे कारशेड येथे एकात्मिक कारशेडच्या माध्यमातून बांधण्यात येणार होते. मात्र शिवसेना-भाजप युती सरकार राज्यात आल्यानंतर त्यांनी एकात्मिक कारशेड रद्द केली आणि मेट्रो ३ ची कारशेड आरेत तर मेट्रो ४ ची कारशेड मोघरपाडा येथे स्थलांतरित करण्यात आली. त्यावेळी ही जागा पाणथळ असून बांधकामासाठी योग्य नाही, ही जागा केंद्र सरकारच्या मालकीची आहे, असे सांगून जागा नाकारण्यात आली. मात्र आता सरकारने मेट्रो ६ साठी मात्र १५ हेक्टर जागा दिली आहे. तसेच आणखी सात हेक्टर जागा दिली जाण्याची शक्यता आहे.