मुंबई: अपुऱ्या मनुष्यबळामुळे सहा महिन्यांपूर्वी गोवंडीमधील मुंबई महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला टाळे ठोकण्यात आले होते. स्थानिकांनी केलेल्या आंदोलनानंतर महापालिकेने पुन्हा एकदा रुग्णालयातील अतिदक्षता विभाग सुरू केला.
चेंबूर, गोवंडी, देवनार, मानखुर्द आणि ट्रॉम्बे परिसरातील नागरिकांसाठी शताब्दी हे महापालिकेचे एकमेव रुग्णालय आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांना या रुग्णालयात मोठ्या प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागत आहे. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या, औषधांचा तुटवडा आशा अनेक समस्या या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना भेडसावत आहेत.
त्यातच अपुऱ्या मनुष्यबळाचे कारण पुढे करीत महापालिकेने सहा महिन्यांपूर्वी रुग्णालयातील अतिदक्षता विभाग बंद केला. या ठिकाणी दहा खाटांचा अतिदक्षता विभाग असून दररोज तीन ते चार रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. मात्र अचानक अतिदक्षता विभागाला टाळे ठोकण्यात आल्याने नागरिक संतप्त झाले होते.
अतिदक्षता विभाग बंद केल्याने गंभीर रुग्णांना शीव अथवा राजावाडी रुग्णालयात जावे लागत होते. शीव आणि राजावाडी रुग्णालयात जाण्यासाठी अर्धा तासांचा अवधी लागत असल्याने रुग्ण दगावण्याची भीती होती. त्यामुळे पालिकेने तत्काळ बंद केलेले अतिदक्षता विभाग सुरू करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत होती.
याबाबत सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र नगराळे यांनी सर्व पक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांना एकत्र करून आंदोलन आणि उपोषण केले. याची दखल घेत सध्या महापालिकेने अखेर पुन्हा एकदा अतिदक्षता विभाग सुरू केला असून यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.