मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या कामगारांच्या पतपेढीच्या पंचवार्षिक निवडणुकीत राजकारण चांगलेच रंगले असून गेली २० वर्षे बेस्टमध्ये सत्ता असलेल्या शिवसेनेला ही निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या (शिंदे) एका पदाधिकारी महिलेला शिवसेनेच्या (ठाकरे) पॅनेलमध्ये उमेदवारी देण्यात आल्यामुळे बेस्टमधील ठाकरे समर्थक कामगारांमध्ये नाराजी पसरली आहेच, पण शहर भागातील एकनिष्ठ शिवसैनिकांमध्येही संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या प्रचारापासून ठाकरेंचे शिवसैनिक लांब राहात आहेत. सदस्यांच्या मनातही संभ्रम निर्माण झाला आहे. दुसरीकडे या महिलेनेही शिवसेनेत (ठाकरे) प्रवेश करण्यास समाज माध्यमांवरून नकार दिला आहे.
दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.ची निवडणूक येत्या १८ ऑगस्ट रोजी होत आहे. या निवडणुकीसाठी वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीत ज्या पॅनलची सत्ता येते त्या कामगार संघटना बेस्ट उपक्रमात बलवान समजल्या जातात. त्यामुळे या निवडणुकीला महत्त्व आहे. मुंबई महापालिकेत गेली २५ वर्षे शिवसेनेची सत्ता होती. त्यामुळे तितका काळ बेस्ट उपक्रमातही शिवसेनेची सत्ता होती. बेस्ट कामगार सेनेलाही बेस्ट उपक्रमात चांगले दिवस होते. त्यामुळे कामगारांच्या पतपेढीतही गेली नऊ वर्षे बेस्ट कामगार सेनेचेच पॅनेल होते. शिवसेनेची दोन शकले झाल्यानंतर बेस्टच्या पतपेढीची होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीतून मुंबई महापालिका निवडणुकीची रंगीत तालिमच सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते एकत्र आले आहेत.
शिवसेना (ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन्ही पक्ष या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आले असून दोन्हीकडच्या उमेदवारांचे एकच उत्कर्ष पॅनेल या निवडणुकीसाठी उतरवण्यात आले आहे. त्यामुळे ही निवडणूक जिंकण्याची खात्री ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होते न होते तोच यामध्ये एक नवीनच वळण आले आहे. आमदार प्रवीण दरेकर व प्रसाद लाड यांची श्रमिक उत्कर्ष सभा, मत्सव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची समर्थ बेस्ट कामगार संघटना आणि शिवसेनेचे (शिंदे) माजी आमदार किरण पावसकर यांची राष्ट्रीय कर्मचारी सेना यांनी एकत्र येऊन सहकार समृध्दी पॅनलची निर्मिती केली आहे. त्यातच आता शिवसेनेच्या (शिंदे) एका कार्यकर्तीचा ठाकरे बंधूंच्या पॅनेलमध्ये समावेश झाल्यामुळे ही निवडणूक ठाकरे बंधूंना जड जाणार असल्याची चर्चा आहे.बबिता पवार या पॅनेलवर असल्यामुळे शिवसैनिकांनी या निवडणुकीच्या प्रचारात सहभाग घेतलेला नसल्याचे चित्र आहे. तसेच ठाकरेंशी एकनिष्ठ असलेले बेस्टचे कामगार या निवडणुकीत फारसा रस घेत नसल्याचीही चर्चा आहे.
आदित्य ठाकरे यांना अंधारात ठेवून उमेदवारी बेस्टच्या माझगाव येथील कर्मचारी बबिता पवार यांना ठाकरे यांच्या उत्कर्ष पॅनलमध्ये समाविष्ट करण्यात आल्यामुळे कामगार सेनेत नाराजी वाढते आहेच, पण आता ही नाराजी शहर भागातील भायखळा, शिवडी विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांमध्येही दिसू लागली आहे. परळमधील बेस्टच्या वसाहतीत पतपेढीचे सर्वाधिक सभासद असून त्यांनी बबिता यांच्या नावाला विरोध केला आहे. परळच्या वसाहतीतील बेस्टच्या कामगारांनी सोमवारी शिवसेना भवनात जाऊन नेते आदित्य ठाकरे यांची भेट घेतली होती. आदित्य ठाकरे यांना अंधारात ठेवून बबिता पवार यांना उमेदवारी दिल्यामुळे शिवसैनिकांमध्येही संतापाची भावना आहे.
खोटा खोटा पक्षप्रवेश ?
बबिता पवार या शिवसेनेच्या (शिंदे) माजी आमदार यामिनी जाधव यांच्या निकटवर्ती आहेत. तसेच पक्षाच्या विधानसभा संघटकही आहेत. आदित्य ठाकरे यांनी बबिता पवार यांचा पक्षप्रवेश करवून घेण्याचे आदेश दिले होते. दोन दिवसांपूर्वी भांडूप येथे प्रचारादरम्यान कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बबिता पवार यांचा सत्कार करून त्यांचा पक्षप्रवेश झाल्याची बातमी मुखपत्रातून दिली. मात्र माझ्या निष्ठा यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांच्या सोबत असल्याचे बबिता पवार यांनी समाज माध्यमांवरून स्पष्ट केले आहे. सहकार क्षेत्रातील ही निवडणूक असून यात कोणी पक्षीय राजकारण आणू नये, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे पवार यांचा भायखळा विधानसभेत पक्षप्रवेश करावा व त्याचे बॅनर लावावे, अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे. परंतु, तसे शक्य नसल्यामुळे शिवसेनेतील बेस्टच्या कामगारांमध्ये नाराजी आहे.