मुंबई : पर्यटकांना महाराष्ट्रातील ऐतिहासिक व सांस्कृतिक इतिहासाची ओळख व्हावी, तसेच त्यांना या ठिकाणी पर्यटनाची संधी मिळावी, यासाठी आयआरसीटीसीने महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या साहाय्याने ऐतिहासिक सहल आयोजित केली आहे. या सहलीत पर्यटकांना रायगड, शिवनेरी, पन्हाळा, प्रतापगड या किल्ल्यांसह महाराष्ट्रातील निवडक देवस्थानांवर फिरण्याची संधी मिळणार आहे. सहा दिवसांच्या या सहलीत मुक्कामासह प्रवास विमा, जेवणाची व्यवस्था, तिकीट, पर्यटनस्थळी फिरण्यासाठी बस सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पहिल्या १०० आरक्षणावर ५ टक्के सूट देण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून येत्या ९ जून रोजी ५ रात्री व ६ दिवसांची ही विशेष सहल रवाना होणार आहे. या विशेष सहलीअंतर्गत पुण्यातील रायगड किल्ला, लाल महाल, कसबा गणपती व शिवसृष्टी, शिवनेरी किल्ला, भीमाशंकर ज्योतिर्लिंग, प्रतापगड किल्ला, महालक्ष्मी मंदिर व पन्हाळा किल्ला आदी ऐतिहासिक व सांस्कृतिक पर्यटन स्थळे पाहण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. या सहलीसाठी पर्यटकांना स्लीपर, एसी २ टियर व एसी ३ टियर कोच आदी पर्याय देण्यात आले आहेत. एकूण ७४८ पर्यटकांची क्षमता असलेल्या या रेल्वेत दादर व ठाणे येथूनही चढण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

सहलीच्या पहिल्या दिवशी रेल्वे कोकण रेल्वेमार्गावरील माणगाव स्थानकाकडे प्रस्थान करेल. रायगड किल्ल्याची सफर पूर्ण झाल्यावर रेल्वे पुण्याच्या दिशेने रवाना होईल. हॉटेलमध्ये रात्रीचे जेवण व रात्रीचा मुक्काम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुण्यातील लाल महाल, कसबा गणपती मंदिर आणि शिवसृष्टी ही ठिकाणे पर्यटकांना दाखवली जातील. त्यानंतर शिवसृष्टी या ऐतिहासिक थीम पार्कमध्ये भेट देण्यात येईल. येथे थ्रीडी तंत्रज्ञानातून शिवाजी महाराजांच्या जीवनकथा दाखवली जाईल. त्यानंतर पर्यटक पुण्यापासून ९५ किलोमीटर अंतरावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानी म्हणजेच किल्ले शिवनेरी येथे भेट देतील. दुपारच्या जेवणानंतर पर्यटक १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक अशा भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिराला भेट देतील. त्यानंतर रात्री पुण्यात मुक्काम करून चौथ्या दिवशी साताऱ्यातील प्रतापगड किल्ल्याचा अनुभव घेतल्यानंतर कोल्हापूरच्या शेवटच्या ठिकाणासाठी रवाना होतील. कोल्हापूरमधील महालक्ष्मी मंदिर, किल्ले पन्हाळा आदींना भेट दिल्यानंतर सहाव्या दिवशी परतीच्या प्रवासाला सुरुवात होईल.

सहलींचे दर

इकोनॉमी (स्लीपर क्लास) – १३ हजार १५५ रुपये (प्रति व्यक्ती)

कम्फर्ट (३एसी) – १९ हजार ८४० रुपये (प्रति व्यक्ती)

सुपीरियर (२एसी) – २७ हजार ३६५ रुपये (प्रति व्यक्ती)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सहलीतील अन्य सुविधा

  • तिकीट
  • आरामदायक हॉटेलमध्ये मुक्काम
  • भोजन (शाकाहारी)
  • पर्यटनस्थळी फिरण्यासाठी बस सुविधा
  • प्रवास विमा
  • टूर एस्कॉर्टची सेवा