मुंबई : आयटीआय अभ्यासक्रमाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली असून १ लाख ४६ हजार ८२० जागांसाठी १ लाख ७३ हजार ६७३ विद्यार्थांनी पहिल्या फेरीसाठी प्रवेश अर्ज भरले होते. त्यातील ८२ हजार ८२२ विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत प्रवेश देण्यात आला आहे.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत आयटीआय अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती. आयटीआयच्या राज्यभरात असलेल्या ९९२ संस्थांमध्ये १ लाख ४६ हजार ८२० इतक्या जागा आहेत. त्यात सरकारी संस्थांमध्ये ९४ हजार २९६ जागा तर खासगी संस्थांमध्ये ५२ हजार ५२४ इतक्या जागा आहेत. त्या जागांसाठी राज्यभरातून १ लाख ७३ हजार ६७३ विद्यार्थांनी नोंदणी केली होती. आयटीआयच्या प्रवेश प्रक्रियेसाठी संचालनालयामार्फत जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या गुणवत्ता यादीत ८२ हजार ८२२ विद्यार्थांना प्रवेश देण्यात आला आहे.
त्यात सरकारी संस्थांमध्ये ६६ हजार ६८० विद्यार्थी तर खासगी संस्थांमध्ये १६ हजार १४२ विद्यार्थ्यांना संधी मिळाली आहे. एकूण जागांच्या ६१.५२ टक्के जागांवर विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला असून त्यात सरकारी संस्थांमधील एकूण जागांपैकी ७०.७१ टक्के जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहेत. तसेच खासगी संस्थांमधील ४०.०२ टक्के जागांसाठी विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
नाशिकमध्ये सर्वाधिक विद्यार्थ्यांना प्रवेश
आयटीआयकडून जाहीर करण्यात आलेल्या जागांमध्ये नाशिकमधून सर्वाधिक १६ हजार ५७ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. त्याखालोखाल पुण्यातून १५ हजार ७३९ विद्यार्थी, औरंगाबादमधून १४ हजार ६४२, अमरावतीमधून १३ हजार ६०९, नागपूरमधून १२ हजार ४१२ विद्यार्थ्यांना जागा जाहीर झाल्या आहेत. मुंबईतून सर्वात कमी १० हजार ३६३ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे.
आयटीआय प्रवेश प्रक्रियेला १५ मे पासून सुरुवात झाली असून २६ मे पासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. १५ मे ते २६ जून या कालावधीत विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. प्राथमिक गुणवत्ता यादी २८ जून रोजी जाहीर करण्यात आली होती. २९ व ३० जून रोजी विद्यार्थ्यांनी हरकती नोंदविल्यानंतर १ जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली होती.