मुंबई : राज्यात विविध ७७ संशोधन केंद्र सुरू आहेत. फणसासाठी कोकण विभागात स्वतंत्र संशोधन केंद्र उभारणे शक्य नसल्याचे अभिप्राय वित्त व नियोजन विभागाने दिला आहे. त्यामुळे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत संशोधन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठाकडून कार्यवाही सुरू झाली आहे, अशी माहिती कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधान परिषदेत दिली.
सदाभाऊ खोत यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे फणस संशोधन केंद्र स्थापन करण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत प्रवीण दरेकर, सतेज पाटील यांनी सहभाग घेतला.
फणसाच्या मूल्यवर्धनासाठी तसेच फणस उद्योगाला चालना देण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये स्वतंत्र फणस संशोधन केंद्र स्थापन करण्याऐवजी विद्यापीठामध्ये स्वतंत्र प्रयोगशाळा स्थापन करण्याचा व त्याकरिता लागणाऱ्या उपकरणांसाठीचा प्रस्ताव शासनास सादर करण्याच्या सूचना डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार दापोली कृषी विद्यापीठाकडून या बाबत कार्यवाही सुरू असल्याची माहिती कोकाटे यांनी दिली.
लांजा येथील संशोधन केंद्रासाठी आग्रह
राज्यात विविध फळे, भाजीपाला आणि अन्य पिकांसाठी ७७ संशोधन केंद्र सुरू आहेत. या संशोधन केंद्रांना पुरेसे मनुष्यबळ नाही. पूरक साधने नाहीत. त्यामुळे या संशोधन केंद्रांचा अनुभव फारसा चांगला नाही, अशी माहिती दिल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी जोरदार आक्षेप घेतला. कोकणासाठी काही देताना तुमचा हात नेहमी आखडता असतो. लांजा येथे मंजूर असलेले केंद्र सुरू करा, अशी मागणी दरेकर यांनी केली. सतेज पाटील यांनीही अशी मागणी केली. त्यानंतर स्वतंत्र संशोधन केंद्र स्थापन करण्याबाबत सदस्यांच्या तीव्र भावना विचारात घेऊन सर्व संबंधित लोकप्रतिनिधींची बैठक घेण्याचे निर्देश सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.