Jain Muni Political Party for Pigeon: मुंबई महानगरपालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कबुतरखाने बंद केल्यामुळे मृत्यू झालेल्या कबुतरांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी जैन समुदायाकडून दादरच्या योगी सभागृह येथे प्रार्थना सभेचे आयोजन केले होते. या धर्मसभेत जैन मुनींनी राजकीय पक्षाची स्थापना केल्याची घोषणा केली. कबुतर आणि इतर प्राण्यांच्या संरक्षणासाठी ‘शांतीदूत जनकल्याण पक्ष’ स्थापन करत असल्याचे जैन मुनींनी जाहीर केले.

जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी दादरच्या धर्मसभेनंतर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. मुंबईतील जैन समाज सर्व समाजाच्या मदतीसाठी धावून जातो. आम्ही महाराष्ट्राच्या पूरग्रस्तांसाठी दोन कोटी रुपयांचा निधी देणगीस्वरुपात दिला. पण आमच्या मुद्द्यांसाठी कुणीही पुढे येताना दिसत नाही. यासाठी आम्हाला राजकीय पक्ष स्थापन करावा लागत आहे, असे निलेशचंद्र विजय म्हणाले.

मुनी निलेशचंद्र विजय म्हणाले, “बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा शिवसेनेची स्थापना केली. तेव्हा त्यांच्या फलकावर वाघाचे चिन्ह होते. वाघ हे माता जगदंबेचे वाहन आहे. त्यामुळेच जगदंबेचा आशीर्वाद शिवसेनेला मिळाला. आताच्या शिवसेनेचे आम्हाला माहीत नाही. शांतीदूत असलेले कबुतर हे आमचे चिन्ह असेल. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही उतरू. प्रत्येक वॉर्डात आमचे उमेदवार उभे राहतील.”

आगामी काळात कबुतर कुणाला घेऊन बुडणार, हे परमेश्वरच सांगू शकेल. आम्ही पुढे गोमाता आणि इतर प्राण्यांसाठीही काम करू, असेही निलेशचंद्र यांनी जाहीर केले. जैन मुनी निलेशचंद्र विजय पुढे म्हणाले, आमचा पक्ष कोणत्याही एका समाजाचा नाही. आज कुत्रा, गाय सुरक्षित नाही. उद्या उंदरावर याल, ते तर गणपतीचे वाहन आहे. माणसाने विकासाच्या नावाखाली झाडे तोडली, घरे बांधली म्हणून कबुतर बेघर झाले. भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून दादर आणि इतर ठिकाणी कबुतरखाने होते.

ठाकरे बंधूसह मंगलप्रभात लोढांनाही टोला

राजकीय पाठिंब्याबाबत बोलताना निलेशचंद्र विजय म्हणाले, आम्ही फक्त बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानतो. बाकी कोणत्याही नेत्यांना आम्ही मानत नाही. मंगलप्रभात लोढा आजच्या धर्मसभेला उपस्थित नव्हते. याबद्दल बोलताना ते म्हणाले, मंगलप्रभात लोढा हे एका समाजाचे मंत्री नसून राज्याचे मंत्री आहेत. ते आमच्याबरोबर का नाहीत? हे त्यांनाच विचारा. आम्ही नेत्यांवर विश्वास ठेवून पाहिला. आता आम्ही स्वतःचा पक्ष काढला आहे.