अपघात टळला

प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी मध्य रेल्वे मार्गावरील दिवा स्थानकापासून साधारण ३०० ते ४०० मीटर अंतरावर रुळावर ठेवण्यात आलेला सात मीटर लांबीचा लोखंडी तुकडा लोकोपायलटच्या वेळीच नजरेस पडल्याने जनशताब्दी एक्स्प्रेसचा अपघात होता होता टळला. या घटनेमागे घातपाताची शक्यता आहे का, याची कसून तपासणी करण्यात येत असून घटनास्थळी रेल्वे पोलिसांची गस्त ठेवण्यात आली आहे.

मंगळवारी, २४ जानेवारी रोजी रात्री १०.४० च्या दरम्यान दादरच्या दिशेने येणाऱ्या मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसचे लोकोपायलट हरेंद्र कुमार यांना दिवा स्थानक आणि पारसिक बोगद्यादरम्यान साधारण ४० मीटर अंतरावर सात मीटर लांबीचा रुळाचा तुकडा पडल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्याने तात्काळ एक्स्प्रेस थांबविली. रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा विभागाने दिवा स्थानक आणि पारसिक बोगद्यादरम्यान एक्स्प्रेस थांबल्याची माहिती देताच आरपीएफचे जवान तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर आरपीएफ, लोकोपायलट (चालक), गार्ड यांनी प्रवाशांच्या मदतीने हा लोखंडी तुकडा उचलून बाजूला केला आणि रेल्वे सेवा रात्री १०.५२ च्या सुमारास सुरू झाली. ही घटना जनशताब्दी एक्स्प्रेसचे लोकोपायलट हरेन्द्र कुमार यांच्या वेळीच निदर्शनास आली नसती तर मोठी दुर्घटना घडली असती. या घटनेची गंभीर दखल घेत रेल्वे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

यामागे घातपात घडवण्याचा कट रचण्यात आला होता का, या दृष्टीने रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांनी तपास करीत आहेत. घटनास्थळी चार ते पाच अज्ञात इसम वावरत होते, अशी माहितीही प्रवाशांकडून मिळाली आहे. त्यामुळे या परिसरातील सक्रिय मोबाइल डेटा मिळवण्याचा प्रयत्न लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफकडून सुरू आहे. हा लोखंडी तुकडा दोन्ही रुळांवर पडला असता तर यांत्रिक संरचनेमुळे लक्षात आले असते आणि रेल्वे वेळीच थांबली असती, मात्र हा लोखंडी तुकडा फक्त एका रुळावर आणि दोन रुळांमधील जागेमध्ये ठेवला असल्यामुळे याची माहिती मिळू शकली नाही, असे रेल्वे पोलिसांनी सांगितले.

१७ मिनिटांत घातपाताचा प्रयत्न

सात मीटर लोखंडी तुकडा आढळला त्यापूर्वी साधारण १७ मिनिटांपूर्वी रात्री १०.२३ च्या सुमारास येथून कर्जत लोकल रवाना झाली होती. आणि त्यानंतर रात्री १०.४० च्या सुमारास दादरच्या दिशेने जाणारी जनशताब्दी एक्स्प्रेसच्या लोकोपायलटला रुळावरील लोखंडी तुकडा दिसला. त्यामुळे या दोन्ही ट्रेनच्या १७ मिनिटांच्या वेळेतच घडामोडी झाल्या असल्याची शक्यता आरपीएफकडून वर्तविली जात आहे.

लोकोपायलटचे कौतुक

दादर-मडगांव जनशताब्दी एक्स्प्रेसचे लोकोपायलट हरेन्द्र कुमार यांनी रुळावरील आडवा असलेला लोखंडी तुकडा पाहिला आणि वेळीच गाडी थांबवली यामुळे मोठा अपघात टळला. यामुळे रेल्वेकडून बक्षीस दिली जाईल, असे मध्य रेल्वे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी जाहीर केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चार ते पाच जणांचा घटनास्थळी वावर असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे या व्यक्ती नेमक्या कोण आहेत, याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. घटनास्थळी सात मीटर लांबीचा रुळाचा तुकडा सापडला. असे तुकडे रुळांच्या कामांसाठी वापरले जातात आणि रुळांच्या बाजूलाच असतात. मात्र हा तुकडा तेथे कसा आला आणि तो रुळावर कुणी टाकला, याचा शोध सुरू आहे. मात्र याबरोबरच नागरिकांनी जागरूक राहण्याची गरज आहे, असे मध्य रेल्वे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी सांगितले.