scorecardresearch

जाट आंदोलनाचा रेल्वेला फटका; विमान कंपन्या मात्र तेजीत!

हरयाणामध्ये सुरू असलेल्या जाट आंदोलनामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला

जाट आंदोलनाचा रेल्वेला फटका; विमान कंपन्या मात्र तेजीत!
जाट आंदोलन

पश्चिम, मध्य आणि कोकण रेल्वेच्या अनेक गाडय़ा रद्द; दिल्ली-चंदीगढ विमान प्रवास सहा ते आठ हजारांनी महाग
हरयाणामध्ये सुरू असलेल्या जाट आंदोलनामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून मुंबईतून उत्तरेत पंजाबच्या दिशेने जाणाऱ्या गाडय़ा बुधवापर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. मात्र विमान कंपन्यांनी आपल्या तिकीट दरांत तब्बल सहा ते आठ हजार रुपयांनी वाढ केल्याने प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
जाट समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी हरयाणात सुरू झालेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही या आंदोलनाचे लोण सर्वप्रथम रस्ते आणि रेल्वे मार्गावर पसरले. आंदोलकांनी रस्ते व रेल्वे मार्ग अडवल्याने मुंबईहून उत्तरेकडे जाणाऱ्या अनेक गाडय़ा रद्द करण्याची वेळ आली आहे. यात पश्चिम रेल्वेने रविवारी १४ गाडय़ा रद्द केल्या असून कोकण व मध्य रेल्वेलाही अनेक गाडय़ा रद्द कराव्या लागल्या.
पश्चिम रेल्वेने सोमवारीही फिरोजपूर जनता एक्स्प्रेस, जम्मू तावी स्वराज्य एक्स्प्रेस, पश्चिम एक्स्प्रेस, देहरादून एक्स्प्रेस, अहमदाबाद-दिल्ली जयंती राजधानी एक्स्प्रेस, अहमदाबाद-हरिद्वार एक्स्प्रेस, अहमदाबाद-दिल्ली आश्रम एक्स्प्रेस, भूज-बरैली एक्स्प्रेस, इंदौर-जम्मू तावी माळवा एक्स्प्रेस, इंदौर-जम्मू तावी सुपरफास्ट एक्स्प्रेस अशा दहा गाडय़ा रद्द केल्या. मंगळवारीही पश्चिम रेल्वेने आठ गाडय़ा रद्द केल्या.

विमानांचे दर चढे
एखाद्या संपाच्या वा बिघाडाच्या वेळी शहरातील रिक्षा-टॅक्सीचालक प्रवाशांना जादा भाडे आकारून नाडतात. हाच कित्ता विमान कंपन्यांनी जाट आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर गिरवला आहे. गेल्या तीन दिवसांत मुंबईहून चंदिगढला जाणाऱ्या विमानांच्या तिकीट दरांत ८३३९ रुपयांची वाढ झाली आहे. सात ते आठ हजारांची तिकिटे सध्या १६ हजारांच्या पुढे मिळत आहेत, तर दिल्ली-चंदिगढ या अंतराच्या प्रवासासाठी इकॉनॉमी क्लाससाठी १५ ते १६ हजार रुपये भाडे आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-02-2016 at 02:18 IST

संबंधित बातम्या