Mumbai Metro मुंबईची अॅक्वा लाइन मेट्रो सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या मेट्रोचं मागच्या आठवड्यात लोकार्पण करण्यात आलं. आता मेट्रो लाइनमधील एका स्थानकाच्या नावावरुन काँग्रेसने गदारोळ सुरु केला आहे. महाराष्ट्र काँग्रेसने हा आरोप केला आहे की मेट्रो स्टेशनचं नाव सायन्स सेंटर इतकंच ठेवण्यात आलं. पंडित जवाहरलाल नेहरु सायन्स सेंटर असं नाव जाणीवपूर्वक ठेवलं नाही.
सचिन सावंत यांनी काय पोस्ट केली आहे?
मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी या संदर्भात एक्स पोस्ट केली आहे. पंडीत नेहरु यांचं योगदान इतकं अविस्मरणीय आहे की भाजपाने त्यांचा कितीही अपमान केला किंवा त्यांचा वारसा नाकारला तरीही त्यांचे प्रयत्न अपयशीच ठरतील. सगळ्या देशाला माहीत आहे की वरळीचा जो भाग जिथे मेट्रो थ्रीचं स्टेशन आहे तिथे नेहरु सायन्स सेंटर आहे. भाजपाला पंडीत नेहरुंच्या नावाची अॅलरजी आहे त्यामुळेच त्यांनी सायन्स सेंटर इतकंच नाव मेट्रो स्थानकाला दिलं आहे.
भाजपाच्या कोत्या मनोवृत्तीचं दर्शन झालं-सावंत
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले, भारताचे पहिले पंतप्रधान आणि भारतरत्न पंडीत जवाहरलाल नेहरुंच्या स्मृतींचा भाजपाने अपमान केला आहे. नेहरुंची दूरदृष्टी भारतासाठीचा त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन, औद्योगिक प्रगतीचा दृष्टिकोन यांचा भाजपाने अपमान केला आहे. भाजपाची कोती मनोवृत्ती, असहिष्णुता आणि तिरस्कार करण्याची वृत्ती दाखवणारी ही कृती आहे. याआधी भाजपाने दिल्लीतल्या नेहरु मेमोरियल म्युझियमचं आणि वाचनालयाचं नाव बदलून ते प्रधानमंत्री संग्रहालय असं ठेवलं होतं. तसंच नेहरु युवा केंद्राचं नाव बदलून माय भारत असं केलं. भाजपाची मानसिकता कशी आहे हेच यातून दिसून येतं.
सचिन सावंत म्हणाले, वरळी मेट्रो स्टेशनला पंडित जवाहरलाल नेहरुंचं नाव दिलं पाहिजे. जगाला कळतं आहे की भारतातील एका महान नेत्याचा कसा अपमान केला जातो आहे. भाजपाची विकृत मानसिकता आणि इतिहास मिटवण्याची वृत्ती यामुळे देशाची प्रतिष्ठा आणि जागतिक प्रतिमा धुळीला मिळाली आहे. आम्ही या लज्जास्पद कृत्याचा तीव्र निषेध नोंदवतो.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने सांगितलं की २०१३ च्या एका अधिसूचनेत मेट्रो स्टेशनचं नाव विज्ञान संग्रहालय ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जी इमारत वरळीत आहे तिचं मूळ नाव विज्ञान केंद्र असंच आहे. त्यामुळेच हे नाव ठेवण्याचा निर्णय झाला होता. मागील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई मेट्रोच्या लाइन ३ चं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. आचार्य अत्रे चौक ते कफ परेड या टप्प्याचं हे लोकार्पण होतं. सिप्झ ते कुलाबा या दरम्यान ही मेट्रो धावणार आहे. मुंबईची पहिली अॅक्वा लाइन मेट्रो ही ३३.५ किमीची आहे. ९ ऑक्टोबरपासून हा संपूर्ण मार्ग सुरु झाला आहे.