जयेश शिरसाट

हाजी मस्तान, करीम लाला यांच्या तस्करीतून जन्माला आलेलं अंडरवर्ल्ड शहरात फोफावू पाहात होतं. त्याच सुमारास लोअर परळच्या सनमिल गल्लीत एक मोठी संघटित टोळी आकार घेत होती. आसपास धडाडत्या गिरण्या आणि लहान-मोठय़ा औद्योगिक वसाहतींनी या टोळीच्या आर्थिक नाडय़ा बळकट केल्या. गिरणी मालकांनीच पायघडय़ा घातल्याने त्या अधिकच भक्कम बनल्या. हाच आर्थिक स्रोत अन्य टोळय़ांना आपल्या हाती हवा होता. तो घेण्यासाठी गल्लीत टोळीयुद्ध घडलं. अस्तित्व टिकवण्यासाठी गल्लीत प्रतिहल्ल्याचे खतरनाक कट आखले गेले.

mumbai, Khar subway, bridge on the Khar subway , residents opposed proposed bridge, residents near khar, residents of khar subway, khar subway news, mumbai news,
मुंबई : खार भुयारी मार्गावरील प्रस्तावित पुलाला स्थानिकांचा वाढता विरोध, निवासी भागातील पुलाच्या अरेखनाला विरोध
Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
Mumbai Coastal Road, Cracks Appear, Controversy Over Traffic Flow, Pedestrian Walkway, bmc, hajiali Pedestrian subway, Pedestrian subway flood in mumbai,
मुंबई : सागरी किनारा मार्गावरील मार्गिकांच्या संख्येवरून नवा वाद, आरोपाचे अधिकाऱ्यांकडून खंडन
Traffic Routes Altered as Nashik s CBS to Canada Corner Road Undergoes 18 Month Concreting Work
काँक्रिटीकरणासाठी नाशिकमधील आठ रस्ते बंद – सीबीएस- कॅनडा कॉर्नर मार्गावर एकेरी वाहतूक

सनमिल गल्ली

लोअर परळ स्थानकातून दुतर्फा जुन्या चाळी, औद्योगिक वसाहतींमधून वाट काढत सेनापती बापट मार्गाकडे नेणारा रस्ता सनमिल गल्ली म्हणून ओळखला जातो. ७०चं दशक उतरतीला लागण्याआधीच इथली सन मिल बंद पडली होती. मात्र त्या परिघात नवनव्या गिरण्या सुरू होत राहिल्या, कुशल-अकुशल हातांना काम देत गेल्या. सनमिल गल्लीच्या परिघात धनराज, अंबिका, रघुवंशी, फोनिक्स, मातुल्य, एम्पायर डाइंग, श्रीनिवास, कमला, सेक्सेरीया, जालन डाइंग, पिरामल, प्रकाश कॉटन, ज्युपिटर, मफतलाल, सीताराम या आणि अशा २३ मोठय़ा गिरण्या होत्या. तोडीसारख्या खासगी औद्योगिक वसाहतींची संख्याही मोठी होती. रेल्वेचं वर्कशॉपही शेजारीच होतं. या गल्लीत आणि परिघात कामाठी, इराणी, बारा, नवी, छोटानी, पारडी अशा असंख्य बहुमजली चाळी उभ्या राहिल्या. त्यात प्रामुख्याने गिरणी कामगारांचा कुटुंबकबिला राहात होता. आजही बहुतांश घरांमध्ये गिरणी कामगार, त्याचे वारस नांदताहेत.

पूर्वी गिरण्यांच्या भोंग्यांनी पाळी सुटल्याची वर्दी दिली की गल्ली हजारो कामगारांनी गजबजून जाई. शेकडो कामगार एकाच वेळी एकाच दिशेने जात. काही वेळाने गल्लीत पुन्हा सामसूम. हा पाठशिवणीचा खेळ पाहून प्रसिद्ध कवी विष्णू सूर्या वाघ यांचं कुतूहल चाळवलं. समाजसेवक दादा गावकर यांच्या घरी वास्तव्यास असताना वाघ यांना ‘गर्दीमधुनी भटकत असता मी गर्दीचा होतो, अखंड कोलाहल गर्दीचा मला समाधीत नेतो..’ या काव्यपंक्ती सुचल्या. पुढे ‘सुशेगात’ या काव्यसंग्रहात त्यांनी या कवितेचा समावेश केला.

गिरण्या, औद्योगिक वसाहतींनी कामगारांचं घर वसवलं तसं एका संघटित टोळीलाही मोठं केलं. कामाठी तथा मानाजी राजुजी चाळीत राहणाऱ्या चंद्रकांत खोपडे ऊर्फ बाब्या या टोळीचा म्होरक्या. बाब्यापाठोपाठ टोळीत बख्तराज भाटकर, बायज्या, देवा, धोंडय़ा, सुमंत, रतीश हे गँगस्टर. तेव्हा अन्य टोळय़ा आर्थिक रसद मिळवण्यासाठी मटका, दारूचे गुत्ते किंवा तिकीट ब्लॅकच्या धंद्यावर अवलंबून होत्या. बाब्याच्या गोल्डन गँगला अशी लूटमार करण्याची पाळी कधी आलीच नाही. औद्योगिक वसाहतींमधून हप्त्यपोटी तगडी रक्कम टोळीच्या तिजोरीत जमा होत होती. वरदाराजन मुदलीयारच्या माध्यमातून हाजी मस्तानच्या तस्करीला गोल्डनचं प्रोटेक्शन होतंच. जेव्हा बाबू रेशीम गोदीतल्या कामगार संघटनांमध्ये वर्चस्व निर्माण करू पाहात होता त्याच सुमारास शहरातले बडे गिरणी मालक गोल्डनच्या ताब्यात होते. ही गँग तेव्हा मालकांच्या सांगण्यावरून संप फोडत होती. हळूहळू कामगार संघटनांमध्ये गोल्डन गँगचं वर्चस्व निर्माण होऊ लागलं. रेल्वे वर्कशॉपवरही गोल्डनचा कब्जा होता. बहुतांश आर्थिक व्यवहार वर्कशॉपमध्ये होत. एका प्रसिद्ध कापड गिरणीच्या मालकाचं पान गोल्डनशिवाय हलत नव्हतं. त्यामुळे ही गिरणी गोल्डनची आणखी एक ठेक होती. बाब्या आणि त्याचे जवळचे साथीदार गल्लीतून बाहेर पडताना सोन्याने मढलेले. प्रत्येकाच्या अंगावर किलो किलोचं सोनं. त्यामुळेच टोळीला गोल्डन गँग हे नाव पडलं.. अशा आठवणी गल्ली सांगते.

१९८१मध्ये दाऊदचा भाऊ शाबीरची प्रभादेवीच्या पेट्रोल पंपावर मन्या सुर्वेने हत्या केली आािण गँगवॉर भडकलं. अंडरवर्ल्डची खरी सुरुवात याच प्रसंगानंतरची. पुढे वर्चस्वाची हाव, स्वार्थ, समज-गैरसमज यातून फाटाफूट घडली आणि शहराच्या कानाकोपऱ्यातल्या टोळय़ा एकमेकांना जुळत गेल्या. गोल्डन गँग दाऊदसोबत उभी राहिली. रमा नाईक, बाबू रेशीमच्या मृत्यूनंतर म्होरक्या बनलेल्या अरुण गवळीला तो राग होता. सोबत गोल्डनची आर्थिक नाडी ताब्यात घेण्यासाठी गवळी उतावीळ होता. त्याच सुमारास बाब्या, बायज्याचा हरकाम्या बंडय़ा आडिवरेकरला गल्लीत चोपण्यात आलं. गल्लीतल्याच नव्हे तर कामानिमित्त गल्लीतून जाणाऱ्या आया-बहिणींकडे नजर वर करून बघायचं नाही, हे गोल्डनचं तत्त्व होतं. त्या तत्त्वाला बंडय़ाकडून तडा गेला आणि गटारात लोळवून बंडय़ाला जाब विचारला गेला. बंडय़ा संतापला. काहीही करून गोल्डनचा आणि बाब्याचा बदला घ्यायचा हे त्याने ठरवलं. ही कुणकुण गवळीचा साथीदार पापलेट बाबूने हेरली. पापलेटने बंडय़ाला गुपचूप दगडी चाळीत नेलं. गल्लीची खडान्खडा माहिती असल्याने गवळीने बंडय़ाच्या खांद्यावरून गोल्डनवर बंदूक चालवली. बंडय़ाने पोलिसांसह निरनिराळय़ा वेशात गल्लीत एन्ट्रय़ा मारल्या. बाब्याच्या जवळ असलेल्या धोंडय़ा, रतीशसह तीन ते चार साथीदारांची हत्या केली. तेव्हा बाब्या ‘टाडा’खाली बंद होता. बंडय़ाच्या निमित्ताने गोल्डनने आपला तळ काही काळासाठी गल्लीतून हलवला आणि आर्थिक स्रोत पुरवणाऱ्या या गिरणगावात दगडी चाळ शिरू शकली.

विदेशात शिकून परतलेल्या अश्विन नाईकची विमानतळावरच हत्या करण्याचा कट गल्लीत आखला गेला. बाब्या आणि त्याच्या साथीदारांनी ठरल्याप्रमाणे अश्विनवर हल्ला केला मात्र तो थोडक्यात बचावला. पुढे नाईक टोळीचा ‘ब्रेन’ रमेश भोगले ऊर्फ डॉक्टरची हत्या घडली. दाऊद टोळीचा शूटर सावत्या, सुभाष सिंग ठाकूरसह रथी महारथी या हत्याकांडात जातीनीशी उतरले. अमर नाईक टोळीची सूत्र चिंचपोकळीच्या १४४ टेनामेन्टमधून हलत. डॉक्टरला टेनामेन्टमध्ये घुसून मारण्यात आलं. या हल्ल्यामागचा मुख्य सूत्रधार बाब्या होता, कारागृहातून त्याने हा कट आखला, असा संशय आजही मुंबई गुन्हे शाखेतले अनुभवी अधिकारी व्यक्त करतात.

कारागृहातून परतल्यानंतर मात्र बाब्या थंडावला. मात्र प्रत्येक टोळीत त्याचं वजन होतं. दोन टोळयांचे म्होरके, गँगस्टर, व्यावसायिक, उद्योगपतींमध्ये मांडवली करून देण्यात बाब्याचा हतखंडा होता. गल्लीतला दरबार, पोलीस आाल्यावर पळण्याचे चोररस्ते, संप फोडण्यासाठी गल्लीतली फिल्डिंग, पडद्यावर पाहिलेला ‘शोले’चा खेळ, मुंबईसह वसईतल्या गँगस्टर्सचा राबता, वरचेवर आयोजित होणारे ऑर्केस्ट्रा, त्यात जान्यामान्या कलाकारांचा सहभाग, एखाद्या गाण्यात विनाकारण घुसवलेलं बाब्याचं नाव, सायकलपटू किशोर कुमारचं रिंगण, कबड्डीचे सामने, गणेशोत्सव आणि नवरात्रीची धूम, बाब्याच्या लग्नानिमित्त सर्वत्र केलेली सजावट अशा आठवणी गल्लीतल्या जुन्या-जाणत्यांना आहेत.

काळानुरूप गल्लीतला अंडरवर्ल्डचा दबदबा ओसरला. रात्रीअपरात्री सनमिल गल्लीचं भाडं रिक्षा-टॅक्सीचालक स्वीकारू लागले. बंद पडलेल्या गिरण्यांच्या जागेत मॉल, कॉर्पोरेट कार्यालयं आणि नव्या औद्योगिक वसाहती उभ्या राहिल्या. त्यामुळे आजही गल्ली आणि कामगार यांच्यातली नाळ कायम आहे. पूर्वीच्या आणि आताच्या गर्दीत मात्र फरक आहे. गालाला, मानेला, हाताला किंवा कपडय़ांवर चिकटलेले धागे, घामाचा दर्प आणि थकलेलं शरीर घेऊन कामगारांची गर्दी गल्लीतून जाताना निवांत होती. गुत्ते शोधत, गप्पा मारत, विचारपूस करत, थट्टा-मस्करी करत, लहान मुलांना खाऊ घेत पुढे सरके. आताची गर्दी मोबाईलला जोडलेले इअर फोन कानात अडकवून नुसती धावते. पूर्वी गल्लीत दुतर्फा किराणा मालाची दुकानं मोठय़ा संख्येने होती. मधल्या काळात तिथे स्टेशनरी, झेरॉक्सची दुकानं आली. त्यानंतर मोबाईल आणि आता सध्या तयार कपडय़ांची दुकानं जास्त दिसतात. गल्लीत खाद्यपदार्थाचे ठेले मोठय़ा प्रमाणात आलेत. तो भाग आता खाऊगल्ली म्हणून ओळखला जातो. गल्लीत लहानाचे मोठे झालेल्यांपैकी अनेकांनी राजकारण, मनोरंजन-माध्यम, क्रीडा, व्यवसायासह अन्य क्षेत्रात नाव कमावलंय. हे या गल्लीचं स्थित्यंतर.

jayesh.shirsat@expressindia.com