मुंबई : अंधेरीतील डी एन नगर परिसरासह कांदिवली, गोरेगाव येथील पुनर्विकास प्रकल्पातील सामान्य रहिवाशी तसेच खरेदीदार, गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप असलेले बांधकाम व्यावसायिक जयेश तन्ना यांच्या लंडनमधील मालमत्तेवर अखेर सक्तवसुली संचालनालयाने टाच आणली आहे. भारतीय चलनात सव्वादोन कोटींचे हे घर घोटाळ्यातील रकमेतूनच घेण्यात आल्याचे संचालनालयाचे म्हणणे आहे. तन्ना यांच्या परदेशातील आणखी मालमत्तांचा शोध घेतला जात असल्याचेही संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

अंधेरीसह कांदिवली आणि गोरेगाव येथील पुनर्विकास प्रकल्पात तन्ना यांच्या साई ग्रुपने गुंतवणूकदारांची ८५ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने तन्ना तसेच भाऊ दीप यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी नऊ गुन्हे दाखल केले. या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने साई ग्रुपशी संबंधित विविध मालमत्ता, कार्यालयांवर मार्चमध्ये धाडी टाकल्या होत्या. त्यानुसार मिळालेल्या माहितीवरुन जूनमध्ये सुमारे ३३ कोटींची मालमत्ता जप्त केली. त्यानंतर त्यांची लंडन येथे मालमत्ता असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याबाबत कार्यवाही सुरु केली. अखेर गेल्या आठवड्यात तन्ना यांचा लंडनमधील बंगला जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत संचालनालयाने ३५ कोटींची मालमत्ता हस्तगत केली आहे.

साई ग्रुपने डी एन नगर परिसरात अल्प उत्पन्न गटातील जुन्या इमारतींचा वेगवेगळी आमिषे दाखवून पुनर्विकास सुरु केला. आठ ते दहा इमारती पुनर्विकासासाठी घेतल्या आणि त्या अर्धवट सोडून दिल्या. लोकांची कोट्यवधी रुपयांची भाडीही थकविली. अखेर रहिवाशांनी पुढाकार घेऊन साई ग्रुपला काढून टाकले. रहिवाशांनीच अन्य विकासकाच्या सहाय्याने पुनर्विकास सुरु केला आहे.

जप्त केलेल्या मालमत्तेतून काही रक्कम मिळावी, यासाठी आता हे रहिवाशी आर्थिक गुन्हे विभागाकडे दाद मागणार आहेत. सक्तवसली संचालनालयाने जप्त केलेल्या मालमत्तेसह अभिनिर्णित अधिकाऱ्याने मंजुरी दिल्यानंतर ती मालमत्ता गुन्हा दाखल असलेल्या यंत्रणेकडे हस्तांतरित केली जाते. सक्तवसली संचालनालयाने आतापर्यंत ३० हजार कोटींची मालमत्ता देशभरात विविध तपास यंत्रणांना हस्तांतरित केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुन्ह्यातून मिळविलेल्या रकमेतून परदेशात मालमत्ता घेण्याचे प्रमाण वाढले असून आतापर्यंत सक्तवसुली संचालनालयाने गुन्ह्यातील १६ हजार कोटींची मालमत्ता जप्त करण्यात यश मिळविले आहे. संचालनालयाने गेल्या वर्षांत ३० हजार कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आतापर्यंत देशभर व परदेशात संचालनालयाने एक एक लाख ५५ हजार कोटींची मालमत्तेवर टाच आणली. त्यापैकी एक कोटी सात हजार कोटींच्या मालमत्तेवर अभिनिर्णय अधिकाऱ्याने शिक्कामोर्तब केले आहे.