जे.जे. रुग्णालयातील त्वचारोग विभागाचे प्रमुख डॉ. महेंद्र कुरा हे मानसिक त्रास देत असल्याचा आरोप करत ‘मार्ड’च्या डॉक्टरांनी गुरूवारी बेमुदत आंदोलन पुकारले हाते. त्याची दखल घेऊन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने गुरूवारी सायंकाळी डॉ. कुरा यांची छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बदली केली आहे. त्यामुळे जे.जे. रुग्णालयातील ‘मार्ड’ने आपला संप तातडीने मागे घेतला असून डॉक्टर्स कामावर रूजू झाले. दरम्यान गुरूवारी पुकारलेल्या संपामुळे रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागातील आरोग्य सेवेवर फारसा परिणाम जाणवला नाही.

हेही वाचा >>> उच्च न्यायालयाने पारपत्र प्राधिकरणाला बजावले, याचिकाकर्तीसह दोन मुलांच्या पारपत्र नूतनीकरणाचे आदेश

त्वचारोग विभागाचे प्रमुख डॉ. महेंद्र कुरा हे मानसिक त्रास देत असल्याचा आरोप करून विभागातील निवासी डॉक्टरांनी १८ डिसेंबरपासून सामूहिक रजा आंदोलन पुकारले होते. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत मंगळवारी झालेल्या भेटीतही डॉ. कुरा यांना हटविण्याबाबत ठोस निर्णय न घेता जे.जे. रुग्णालयातील ‘मार्ड’ने गुरूवारपासून बेमुदत संप पुकारला. या संपाचा परिणाम रुग्णालयातील अन्य विभागांमध्ये झाला नसला तरी बाह्यरुग्ण विभागात अल्प परिणाम दिसून आला. दरम्यान या संपाची दखल घेऊन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने प्रशासकीय कारण देत डॉ. महेंद्र कुरा यांची छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बदली केली. त्यासंदर्भातील शासन आदेश काढल्यानंतर संप मागे घेण्यात येत असल्याचे गुरूवारी सायंकाळी जाहीर करण्यात आले. तसेच सर्व निवासी डॉक्टरांना तातडीने कामावर रूजू होण्याच्या सूचना दिल्याचे ‘मार्ड’चे अध्यक्ष शुभम सोनी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले. दरम्यान, गुरूवारी सकाळी बाह्यरुग्ण विभागात निवासी डॉक्टर नसले तरी प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, विभाग प्रमुख आणि बंधपत्रित निवासी डॉक्टर उपस्थित असल्याने बाह्यरुग्ण विभागावर फारसा परिणाम जाणवला नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.