मुंबईः नंदुरबार जिल्ह्यात महिका ब्रँडचे रिफाईन्ड सोयाबीन तेल व कमला ब्रँडचे शेंगदाणा तेलात भेसळ करुन त्यांची विक्री करणाऱ्या कंपनीला टाळे ठोकण्याची तसेच या प्रकरणात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी विभागाचे सह आयुक्त आणि सहाय्यक आयुक्तांना निलंबित करण्याची घोषणा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सोमवारी विधानसभेत केली.
आमश्या पाडवी, समीर कुणावार,हिरामण खोसकर आदी सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरील चर्चेदरम्यान झिरवाळ यांनी ही घोषणा केली. अक्कलकुवा येथील मे. गोपाल प्रोव्हिजन ही कंपनी महिका ब्रँडचे रिफाईन्ड सोयाबीन तेल व कमला ब्रँडचे शेंगदाणा तेलात भेसळ करुन त्याची विक्री करीत असल्याची बाब समोर आल्यानंतर या तेलाचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले होते. प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार हे नमुने अन्न सुरक्षा मानकांनुसार अप्रमाणित आढळले. त्यामुळे या कंपनीवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र कंपनीने अपील केल्यामुळे नमुने फेरविश्लेषणासाठी सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, मैसूर येथे पाठविण्यात आले आहेत. या कंपनीच्या संचालकांविरोधात गुजरातमध्येही गुन्हे दाखल झाल्याचे त्यांनी संगितले. ही कंपनी तेलात भेसळ करीत असल्याचे उघडकीस आल्यानंतरही कारवाई करण्यास विलंब लावल्याबद्दल विभागाच्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलली जातील असेही झिरवाळ यांनी यावेळी सांगितले.