मुंबई : कांदिवलीच्या समता नगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिसाचा नालासोपारा रेल्वे स्थानकात मंगळवारी दुपारी रुळ ओलांडताना मृत्यू झाला. गणेश राऊळ (३२) असे या पोलिसाचे नाव आहे. दरम्यान, रेल्वे रूळ ओलांडताना सर्वाधिक अपघात होत असून मागील १० वर्षांत रेल्वे रुळ ओलांडताना १४ हजार जणांनी जीव गमावला आहे.
शहराची लोकसंख्या सतत वाढत असून त्याचा ताण लोकलवर येत असतो. प्रचंड गर्दीमुळे ट्रेनमधून खाली पडणे, रुळ ओलांडताना, फलाटावरील पोकळीत पडून, वीजेचा धक्का लागून, तसेच चेंगराचेंगरीमुळे दररोज अपघात होत असतात. रेल्वे रूळ ओलांडणे धोकादायक असून त्याबाबत सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. मात्र तरीही रेल्वे रूळ ओलांडण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. रेल्वे रूळ ओलांडताना मंगळवारी एका पोलिसाला आपला जीव गमवावा लागला.
रुळ ओलांडणे जीवावर बेतले…
पोलीस हवालदार गणेश राऊळ (३२) कांदिवलीच्या समता नगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. ते नालासोपारा येथे पत्नी आणि दोन मुलांसह रहात होते. ते मंगळवारी कामावर जाण्यासाठी नालासोपारा स्थानकात आले. फलाट क्रमांक ४ वरून चर्चगेटच्या दिशेने जाणारी लोकल त्यांना पकडायची होती. मात्र उशीर झाल्याने त्यांनी जीन्याचा वापर न करता रुळ ओलांडायचा प्रयत्न केला. दुपारी २.३० च्या सुमारास त्यांना लोकलने धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या खिशातील ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटली.
कामावर पोहोचायला उशीर झाला होता…
नालासोपारा स्थानकातील रूळ ओलांडताना हा अपघात झाल्याची माहिती वसई रोड रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान डांगे यांनी दिली. राऊळ सकाळी कामावर येतात. मात्र मंगळवारी कार्यालयात पोहोचण्यास उशीरा येणार असल्याचे त्यांनी कळवले होते, अशी माहिती समता नगर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त कैलास बर्वे यांनी दिली. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी नालासोपारा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
रूळ ओलांडताना १४ हजार जणांचा मृत्यू
मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गावर होणाऱ्या अपघातात सरासरी ८ जणांचा मृत्यू होत असतो. परंतु सर्वाधिक अपघात रेल्वे रूळ ओलांडताना होतात. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार जानेवारी २०१५ ते मे २०२५ या १० वर्षांच्या कालावधीत एकूण २६ हजार ५४७ जणांचा विविध अपघात आणि दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. त्यापैकी सर्वाधिक म्हणजे १४ हजार १७५ जणांचा मृत्यू रेल्वे रूळ ओलांडताना झाला आहे. लोकलमधून पडणे, रेल्वेच्या खांबाला घडकणे, वीजेचा धक्का, आत्महत्या आदी कारणांमुळेही मृत्यू होत आहे.