मुंबई: शाळांना ई-मेलद्वारे धमकी देण्याचे सत्र सुरूच आहे. कांदिवली येथील एक शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी सोमवारी देण्यात आली होती. मात्र तपासणीनंतर शाळेत काहीही संशयास्पद आढळले नाही.
कांदिवली पश्चिम येथे आंतरराष्ट्रीय मंडळाची केईएस शाळा आहे. शाळेच्या अधिकृत ई-मेल आयडीवर सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास एक मेल आला. शाळा बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी या ई-मेलमध्ये देण्यात आली होती. शाळा व्यवस्थापनाने त्वरित याबाबत कांदिवली पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी श्वान पथकाच्या मदतीने शाळा आणि परिसराची तपासणी केली. खबरदारीचा उपाय म्हणून शाळेतील विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले. शाळेची दुपारी कसून तपासणी केल्यानंतर काहीच सापडले नाही.
शाळा व्यवस्थापनाला हा ई-मेल सोमवारी सकाळी १० वाजून ५५ मिनिटांनी आला होता. सुमारे तीन तास आम्ही कसून तपासणी केली. मात्र आम्हाला काही संशयास्पद आढळले नाही, अशी माहिती कांदिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवी अडाणे यांनी दिली. ई-मेल पाठवणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि परिसरातील शाळा बॉम्बने उडवण्याची धमकी देणारे ई-मेल येत आहेत. यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.