मुंबई : मुंबईत २६ मे रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयाच्या अतिदक्षता विभाग व रुग्णकक्ष ४ अ मध्ये पाणी तुंबल्याची घटना घडली होती. यावरून मुंबई उच्च न्यायालयाने रुग्णालय प्रशासनावर ताशेरेही ओढले. मात्र २१ जुलै रोजी सकाळी झालेल्या जोरदार पावसाचे पाणी केईएम रुग्णालयाच्या रुग्णकक्ष ९ मध्ये शिरले आहे. मात्र रुग्णकक्षात सफाई कामगारांनी हे पाणी तातडीने न काढल्याने सायंकाळपर्यंत रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना पाण्यातून फिरावे लागत होते.
मुंबईत २१ जुलै रोजी सकाळी जोरदार पाऊस झाला. यावेळी केईएम रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या रुग्णकक्ष ९ च्या बाहेरील व्हरांड्यामधून सकाळी मोठ्या प्रमाणात पाणी रुग्णकक्षामध्ये शिरले. रुग्णकक्षामध्ये शिरलेले पाण्यातून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना ये-जा करावी लागत होती. पाणी बाहेर काढण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांनी परिचारिकांकडे तक्रार केली असता त्यांनी सफाई कामगारांना पाणी काढण्यास सांगा, असे उत्तर दिले. परिणामी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना पाण्यातून ये – जा करावी लागत होती. पावसाच्या पाण्यामुळे सर्वत्र ओले झाल्याने पाय घसरून पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र सकाळपासून रुग्णांच्या नातेवाईकांकडून वारंवार पाणी काढण्यास सांगूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. तसेच रुग्णकक्षामध्ये सफाई कामगारच नसल्याने पाणी सायंकाळपर्यंत साचून राहिले होते. सायंकाळी ४ वाजल्यानंतर रुग्णकक्षातील पाणी काढण्यात आले.
दरम्यान मुंबईमध्ये २६ मे रोजी झालेल्या जोरदार पावसामध्ये केईएम रुग्णालयातील बालरोग अतिदक्षता विभाग व रुग्णकक्ष ४ अ या रुग्णकक्षांच्या वऱ्हांड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते. त्यामुळे या रुग्णकक्षामध्ये दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना काही काळ त्रासाला सामोरे जावे लागले. दरम्यान, वऱ्हांड्यात तुंबलेले पाणी काढण्यासाठी पंप लावावे लागले होते.