मुंबई : रक्तविकार किंवा रक्ताच्या कर्करोगाने ग्रस्त मुले आणि प्रौढांच्या संख्येत वाढ होत आहे. या रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी त्यांच्यावर अस्थिमज्जा प्रत्यारोपण (बाेन मॅरो ट्रान्सप्लांट) महत्त्वपूर्ण ठरते. मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयामध्ये अस्थिमज्जा प्रत्यारोपण उपचार पद्धती लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र स्थापनेची पायाभरणी नुकतीच करण्यात आली. त्यात लहान मुलांबरोबरच प्रौढांवरही उपचार होणार आहेत.
ल्युकेमिया, लिम्फोमा, मल्टिपल मायलोमा, ॲप्लास्टिक ॲनिमिया, थॅलेसेमिया आणि सिकल सेल यांसारख्या रक्तविकाराने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी अस्थिमज्जा प्रत्यारोपण ही उपचार पद्धती महत्त्वपूर्ण ठरते. मुंबई महानगरपालिकेच्या बोरिवली येथे बीएमटी केंद्र आणि शीव रुग्णालयातील बीएमटी केंद्रांवर या आजारांवर उपचार होतात. अस्थिमज्जा प्रत्यारोपणासाठी रक्तविकार किंवा रक्त कर्करोगाने ग्रस्त रुग्णांची वाढती प्रतीक्षा यादी लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या अधिकाधिक रुग्णालयांमध्ये अस्थिमज्जा प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पावले उचलली आहेत.
त्यानुसार केईएम रुग्णालयात अस्थिमज्जा प्रत्यारोपण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या केंद्राची पायाभरणी नुकतीच करण्यात आली असून पुढील ९ ते १२ महिन्यांत हे केंद्र व रुग्ण कक्ष सुरू हाेईल. या केंद्रामध्ये गोरगरीब रुग्णांवर अर्ध्याहून कमी किंमतीमध्ये उपचार होणार आहेत. या केंद्रात केवळ लहान मुले, तरुणांवरच नाही तर प्रौढांवरही अस्थिमज्जा प्रत्यारोपण करता येणार आहे. प्रौढांवर अस्थिमज्जा प्रत्यारोपण करणारे केईएम हे महानगरपालिकेचे पहिले रुग्णालय ठरणार आहे. अस्थिमज्जा प्रत्यारोपण केंद्राच्या स्थापनेसाठी जवळपास एक कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. परंतु हा सर्व खर्च सामाजिक दायित्व निधीतून करण्यात येणार असल्याची माहिती केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी दिली.
खासगी रुग्णालयात लाखो रुपयांचा खर्च
अस्थिमज्जा प्रत्यारोपण केंद्रात रुग्णांसाठी चार खाटा असणार आहेत. तसेच त्या केंद्रात पाच डॉक्टरांची विशेष टीम कार्यरत असेल. त्यामुळे अस्थिमज्जा प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या कमी होण्यास मदत होईल. खाजगी रुग्णालयांमध्ये अस्थिमज्जा प्रत्यारोपणाचा खर्च २० ते ४० लाख रुपयांपर्यंत असतो. परंतु केईएममध्ये सरकारी आरोग्य योजना आणि देणग्यांच्या मदतीने रुग्णांचे अस्थिमज्जा प्रत्यारोपण करण्याची योजना आखण्यात येत असल्याचे डॉ. संगीता रावत यांनी सांगितले.
मुंबई महानगरपालिकेमार्फत दोन केंद्र कार्यरत
सध्या महानगरपालिका बोरिवली येथे बीएमसी- कॉम्प्रिहेन्सिव्ह थॅलेसेमिया केअर, पेडियाट्रिक हेमॅटोलॉजी-ऑन्कोलॉजी आणि बीएमटी केंद्र आणि शीव रुग्णालयामध्ये बीएमटी सेंटर चालवले जाते. बोरिवलीमध्ये ३०० हून अधिक आणि शीव रुग्णालयामधील केंद्रामध्ये १०० हून अधिक मुलांवर अस्थिमज्जा प्रत्यारोपण करण्यात येते.