मुंबई : मुंबई महापालिकेच्या केईएम, नायर, शीव आणि क्षयरोग शिवडी रुग्णालयामध्ये रोजंदारी व बहुउद्देशीय पद्धतीने कार्यरत असलेल्या ९५७ कामगारांना मागील दोन वर्षांपासून बोनस देण्यात आलेला नाही. या कर्मचाऱ्यांनी त्याच्या निषेधार्थ मंगळवारी वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांच्या संचालकांच्या नायर दंत रुग्णालयातील कार्यालयाबाहेर ‘बोंबाबोंब आंदोलन’ केले. यावेळी त्यांनी प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी केली. दरम्यान, बोनस देण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे आश्वासन महापालिका मुख्य रुग्णालय संचालिका डॉ. नीलम अंद्राडे यांनी दिले.
महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये २००९–१० पासून रोजंदारी कामगार आणि २०१६–१७ पासून बहुउद्देशीय कामगार किमान वेतनावर सेवेत आहेत. २०२२–२३ मध्ये दिवाळीसाठी पाच हजार रुपये बोनस देण्यात आला. मात्र त्यानंतरच्या २०२३–२४ मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री आणि महापालिका आयुक्तांनी मान्यता दिल्याचे जाहीर करूनही आरोग्य विभागाकडून वेळेत प्रस्ताव न पाठविल्याने या कामगारांना मुंबई महानगरपालिका प्रशासनाने बोनस नाकारला. यंदाही मुख्यमंत्री आणि महापालिका आयुक्तांनी बोनस देण्यास मान्यता दिली. महापालिका उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे यांनी १६ ऑक्टोबर २०२५ रोजी संचालकांना प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते.
मात्र यंदाही वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांच्या संचालकांकडून प्रस्ताव सादर करण्यात आला नाही. त्यामुळे सलग दोन वर्षे बोनसपासून वंचित ठेवण्यात आल्याने या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. कामगारांनी महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगरानी, अतिरिक्त आयुक्त डॉ. विनीत शर्मा, उपआयुक्त (वित्त) प्रशांत गायकवाड, उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे आणि संचालक डॉ. निलम अंद्राडे यांना भेटून, तसेच पत्रव्यवहार करून वारंवार विनंती केली. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने अखेर मंगळवारी सर्व कामगारांनी बोंबाबाेंब आंदोलन केल्याचे म्युनिसिपल मजदूर युनियनच्या सहायक सरचिटणीस प्रदीप नारकर यांनी सांगितले. या आंदोलनानंतर बोनस देण्यासंदर्भातील प्रस्ताव तातडीने सादर करण्यात येणार असल्याचे आश्वासन डॉ. नीलम अंद्राडे यांनी दिले.
