मुंबई : मुंबई ते सिंधुदुर्ग दरम्यान कोकणातील रस्ते प्रचंड खड्डेमय आहेत. त्यामुळे स्वतःच्या वाहनाने जाणे कोकणवासियांना शक्य होत नाही. दुसरीकडे रेल्वेगाड्यांची आरक्षित तिकिटे मिळत नसल्याने प्रवाशांना कोकणात जायचे कसे असा प्रश्न पडला आहे. कोकण रेल्वेद्वारे रो-रो कार सेवा सुरू केली. परंतु, ही सेवा कोलाड ते वेर्णा थेट असल्याने आणि वेळेचा अपव्यय होत असल्याने या सेवेला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ही सेवा चालू करण्यापूर्वीच बंद होऊ नये, यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने या सेवेत एका थांब्यांची वाढ केली आहे.
आरक्षण कधी सुरू झाले?
यावर्षी २७ ऑगस्ट रोजी गणेशोत्सव असून, रो-रो कार सेवा २३ ऑगस्टपासून सुरू होईल. यासाठी २१ जुलै रोजीपासून आरक्षण खुले झाले. परंतु, ५ ऑगस्टपर्यंत फक्त एकाच प्रवाशाने रो-रो कार सेवेचे आरक्षण केले. तर, ५० हून अधिक प्रवाशांनी चौकशी केली. परंतु, आरक्षण केले नाही. त्यामुळे ही सेवा चालू होण्याआधीच बंद होण्याची भीती कोकण रेल्वे प्रशासनाला आहे.
कोणता नवा थांबा?
रायगड जिल्ह्यातील कोलाड ते गोव्यातील वेर्णा थेट सेवेमुळे अनेक प्रवासी या सेवेबाबत नाखुश होते. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव रोड या रेल्वे स्थानकात रो-रो कार सेवेला थांबा दिला आहे. परंतु, या सेवेत नवा थांबा दिल्याने, जुन्या रो-रो कार सेवेच्या वेळापत्रकात बदल झाला आहे.
नवीन वेळापत्रक असे आहे
कोलाड ते वेर्णा या प्रवासासाठी दुपारी ३ वाजता कोलाडवरून रो-रो कार सुटेल. तर, ही रो-रो कार नांदगाव रोड येथे रात्री १० वाजता पोहचेल. तर, नांदगाव रोड येथून रात्री १२ वाजता सुटेल. त्यानंतर वेर्णा येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता रो-रो कार पोहचेल. तर, वेर्णा येथून दुपारी ३ वाजता सुटून नांदगाव रोड येथे रात्री ८ वाजता पोहचेल. त्यानंतर येथून रात्री १०.३० वाजता रो-रो कार सुटेल. कोलाड येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता रो-रो कार पोहचेल. रो-रो कार सेवा सुटण्याच्या तीन तास आधीच प्रवाशांना स्थानकात पोहचणे गरजेचे आहे. म्हणजे प्रवाशांना कोलाड-वेर्णा सेवेसाठी प्रवाशांना कोलाड येथे दुपारी १२ वाजता पोहचावे लागेल. तसेच, वेर्णा ते कोलाड सेवेसाठी प्रवाशांना वेर्णा येथे दुपारी १२ वाजता आणि नांदगाव रोड येथे सायंकाळी ५ वाजता पोहचणे आवश्यक आहे.
या सेवेसाठी शुल्क किती
कोलाड ते वेर्णा सेवेसाठी प्रत्येक वाहनासाठी ७ हजार ८७५ रुपये शुल्क, कोलाड ते नांदगाव रोड सेवेसाठी प्रत्येक वाहनासाठी ५,४६० रुपये शुल्क असेल. आरक्षण करतेवेळी ४ हजार रुपये नोंदणी शुल्क घेतले जाईल. तर, उर्वरित रक्कम प्रवासाच्या दिवशी जमा करावी लागेल. अपुरे आरक्षण म्हणजे १६ पेक्षा कमी वाहने असल्यास, फेरी रद्द केली जाईल आणि नोंदणी शुल्क पूर्णपणे परत केले जाईल.
प्रवाशांनाही प्रवास करता येणार
रो-रो सेवेला तृतीय वातानुकूलित डबा आणि द्वितीय वातानुकूलित डबा जोडण्यात येणार आहे. त्यामुळे खासगी वाहन असलेल्या प्रवाशांचा प्रवास एकाचवेळी होईल. एका खासगी वाहनांसाठी फक्त तीन प्रवाशांना या डब्यातून प्रवास करण्याची मुभा असेल. यासाठी प्रवाशांना तृतीय वातानुकूलित डब्यासाठी प्रति प्रवासी ९३५ रुपये आणि द्वितीय वातानुकूलित डब्यासाठी १९० रुपये मोजावे लागतील.