मुंबई : दिवाळीनंतर कोकणातून मुंबईकडे तेजस एक्स्प्रेसने प्रवास करताना, प्रवाशांच्या खानपानात घोळ असल्याचे आढळून आले. कुडाळ ते ठाणे असा तेजस एक्स्प्रेसने प्रवास करताना प्रवाशांना कचोरी, समोसा देण्याऐवजी फक्त एक बिस्किटचे पाकीट देण्यात आले. तिकीटात जेवणाचा पर्याय निवडला नव्हता अशा प्रवाशांना कचोरी आणि समोसे चढ्या दराने देण्याचा प्रकार घडला.
गाडी क्रमांक २२१२० मडगाव ते सीएसएमटी तेजस एक्स्प्रेसला प्रवासी पसंती देतात. परंतु, तेजस एक्स्प्रेसमधील असुविधांनी प्रवासी वैतागले आहेत. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) द्वारे जाहीर करण्यात आलेल्या खाद्यपदार्थानुसार एक सुकी कचोरी/समोरा, चीज सॅंडविच, प्री मिक्स चहा अथवा काॅफी, कॅरमल पाॅपकाॅर्न आणि सीलबंद थंडपेय मिळणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात प्रवाशांना एक बिस्किट पाकीट, एक मसाला शेंगदाणे पाकीट, सीलबंद थंडपेय आणि चहा देण्यात आला. याबाबत प्रवाशांनी पॅन्ट्री व्यवस्थापकाला विचारणा केली असता, रेल्वेगाडीत नाश्ता कमी चढवला गेल्याने कचोरी, सॅंडविचच्या बदल्यात १० रुपयांचे बिस्कीट देण्यात आले, असे पॅन्ट्री व्यवस्थापकाने सांगितले. परंतु, नंतर असे निदर्शनास आले की, ज्यांनी जेवणाचा पर्याय तिकीटात निवडला नव्हता, अशा प्रवाशांना कचोरी, समोसे जास्त दरात विकले गेले, असे प्रवाशांनी सांगितले. तसेच रात्रीच्या जेवणाच्यावेळी काश्मिरी पुलाव, नवरत्न कुर्मा, डाळ तडका, बटाटा शिमला अथवा बटाटा गाजर मटार अशी भाजी तीन चपात्या किंवा दोन पराठे, गोड शिरा, दही, लोणचे, मीठ अशी थाळी आणि सॅनिटायझर देणे अपेक्षित होते. परंतु, पुरेसे जेवण देण्यात आले नाही. तसेच जेवणाचा दर्जाही चांगला नव्हता असे प्रवाशांचे म्हणणे आहे. आयआरसीटीसीने जाहीर केलेल्या यादीनुसार, जेवण न मिळाल्याने प्रवाशांनी तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, याबाबत अधिक माहिती घेण्यात येईल, असे आयआरसीटीसीद्वारे सांगण्यात आले.
अन्नाची गुणवत्ता आणि त्याचे प्रमाण वारंवार असमाधानकारक आहे. कचोरी/समोसा ऐवजी स्वस्त बिस्कीट दिले जाते. काही केटरिंग कर्मचाऱ्यांद्वारे प्रवाशांशी असभ्य वर्तन करण्यात येते. तसेच तेजस एक्स्प्रेसमधील स्वयंचलित दरवाजे योग्यरित्या काम करत नाहीत. काही डब्यांमधील विद्युत प्रणाली नादुरूस्त आहे. आसने तुटलेल्या अवस्थेत आहेत. डब्यात स्वच्छतेचा अभाव आहे. यांसह तेजस एक्स्प्रेसच्या वक्तशीरपणा पूर्णपणे खालावलेली आहे. अनेकवेळा तक्रारी करून देखील त्याबाबत सकारात्मक पावले उचलली जात नाही. परिणामी, एकेकाळी ‘ब्रँड’ म्हणून धावणाऱ्या तेजस एक्स्प्रेसची सेवा खालवाली आहे. – अक्षय महापदी, सचिव, अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती
तेजस एक्स्प्रेसमधील जेवण निकृष्ट दर्जाचे असते. याबाबत तक्रारी करून देखील कोणतीही सुधारणा झाली नाही. आता तेजस एक्स्प्रेसमध्ये खानपानात घोटाळा होणे सुरू झाले आहे. आयआरसीटीसीने जाहीर केलेल्या खाद्यपदार्थानुसार, जेवण, नाश्ता मिळणे अपेक्षित असताना, आता खाद्यपदार्थांची अदलाबदली होऊ लागली आहे. याबाबत आयआरसीटीसी, रेल्वे प्रशासन, रेल्वे मंडळाने लक्ष देणे आवश्यक आहे. – श्रेयस पटवर्धन, प्रवासी
