राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक आणि आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास करणारे समीर वानखेडे यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप करण्याचा केले आहेत. नवाब मलिक यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत समीर वानखेडे यांचे आंतरराष्ट्रीय ड्रग्जमाफियाशी संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

मुंबईत झालेल्या क्रूझ पार्टीमध्ये एक आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया आपल्या बंदुकधारी प्रेयसीसह सहभागी असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. “माझ्या माहितीनुसार, त्या पार्टीमध्ये एक आंतरराष्ट्रीय ड्रग्जमाफिया उपस्थित होता. त्याच्यासोबत त्याची बंदुकधारी प्रेयसीही होती. जो तिथे नाचत असल्याचं दिसत आहे, तो दाढीवाला आहे. तो दाढीवाला कोण आहे हे एनसीबीच्या सर्वांना माहित आहे. मला मिळालेल्या माहितीनुसार, तो काही काळ तिहार कारागृहात होता, राजस्थानच्या कारागृहातही होता. याची मैत्री वानखेडेंसोबतही आहे. काही अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की गोव्यातही त्यांचं मोठं रॅकेट आहे,” असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता.

त्यानंतर आता ड्रग्ज माफियांशी संबंध असल्याने समीर वानखेडेंनी त्यांना पकडले नाही या नवाब मलिकांच्या आरोपांवर समीर यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरने प्रतिक्रिया दिली आहे. “नवाब मलिकांनी हे कोर्टात सिद्ध करावे की त्या व्यक्तीकडे किती ड्रग्ज होते आणि त्याचे समीर वानखेडे सोबत काय बोलणे झाले. नवाब मलिकांकडे काही पुरावे असतील त्यांनी ते कोर्टात सादर करावेत. तुम्ही मंत्रीपद घेताना शपथ घेतली होती की कोणाचे खाजगी जीवन उघड करणार नाहीत. मला आता असं वाटतंय तुम्ही इतक्या खालच्या दर्जाला जात आहात की तुम्हाला तुमच्या मंत्रीपदाची काही पडलेली नाही. ते म्हणाले की राजीनामा देईल तर कदाचित त्यांना तो द्यावा लागेल. माझ्या लग्नाचा राजकारणाशी काय संबंध. त्यांना लाज वाटली पाहिजे, असे क्रांती रेडकर एबीपी माझासोबत बोलताना म्हणाली.

काय म्हणाले होते नवाब मलिक?

नवाब मलिक यांनी सादर केलेली कोणतीही कागदपत्रे बनावट असल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ राजीनामा देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. “माझ्याकडून सादर केलेली कोणतीही कागदपत्रे बनावट असल्याचे आढळल्यास मी राजीनामा देण्यास तयार आहे. अन्यथा त्यांनी (समीर वानखेडे) राजीनामा द्यावा. माझ्या जावयाला अशाच प्रकरणामध्ये गोवण्यात आले होते आणि आता आर्यन खानलाही फसवण्यात आले आहे,” असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.