मुंबई: शस्त्रांची विक्री करण्यासाठी आलेल्या एका आरोपीला गुरुवारी रात्री कुर्ला पोलिसांनी अटक केली. या आरोपीच्या ताब्यातून पोलिसांनी एक देशी कट्टा आणि एक जिवंत काडतूस हस्तगत केले असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. कुर्ल्यातील एल.बी.एस. मार्गावरील महाराष्ट्र वजन काटा परिसरात एक व्यक्ती शस्त्रास्त्र विकण्यासाठी येणार असल्याची माहिती कुर्ला पोलिसांना मिळाली. त्यानुसार कुर्ला पोलीस ठाण्याच्या पथकाने गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास या परिसरात सापळा रचला.

तेथे एक व्यक्ती संशयास्पदरित्या फिरताना दिसताच पोलिसांनी तात्काळ झडप घालून त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची तपासणी केली असता, त्याच्या बॅगेत एक देशी कट्टा आणि एक जिवंत काडतूस सापडले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव पप्पू शर्मा (३४) असून तो चुनाभट्टी परिसरातील रहिवासी आहे. ही शस्त्रे विक्रीसाठी आणल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.