मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाने ७१ दुकानांच्या ई लिलावासाठी नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेला सुरुवात केली आहे. या ई लिलावासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया शुक्रवारी (२६ सप्टेंबर) रात्री संपुष्टात येणार होती. मात्र त्याआधीच शुक्रवारी दुपारी अर्ज भरण्यासह बोली लावण्याच्या प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली. आता अर्ज भरण्यासाठी १० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून नवीन वेळापत्रकानुसार १६ ऑक्टोबर रोजी ई लिलावाच्या निकाल जाहीर होणार आहे. कोकण मंडळाच्या दुकानांना इच्छुकांकडून प्रतिसादच मिळत नसल्याने मुदतवाढ देण्याची नामुष्की कोकण मंडळावर ओढवली आहे.
मुंबई मंडळाच्या १४९ दुकानांसाठी नुकताच ई लिलाव पार पडला. या ई लिलावात केवळ ७० दुकानांची विक्री झाली असून ७९ दुकाने विक्रीवाचून रिक्त राहिली आहेत. दुकाने महागडी आणि जुनी असल्याने मुंबईकरांनी ई लिलावास प्रतिसाद दिला नाही. तर आता दुसरीकडे कोकण मंडळाच्या दुकानांच्या ई लिलावाकडेही इच्छुकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
विरार बोळींजमधील ४४ आणि चितळसरमधील २७ दुकानांच्या ई लिलावासाठी नोंदणी, अर्जविक्री – स्वीकृती प्रक्रियेस ११ स्पेटबरपासून सुरुवात करण्यात आली होती. तर अर्ज भरून संगणकीय पद्धतीने कागदपत्रे जमा करण्याची मुदत २५ सप्टेंबर रोजी रात्री ११.५९ पर्यंत होती. तर अनामत रक्कम भरून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २६ सप्टेंबरपर्यंत होती. त्यानंतर पुढील कार्यवाही करून १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ पासून पात्र अर्जदारांना संगणकीय पद्धतीने बोली लावून ई लिलावात सहभागी होता येणार होते. त्यानंतर १४ ऑक्टोबरला ई लिलावाचा निकाल सकाळी ११.०० वाजता जाहीर होणार होता.
मात्र कोकण मंडळाच्या दुकानांना प्रतिसादच मिळत नसल्याने मंडळाने अखेर नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती, बोली आणि निकाल या सर्व प्रक्रियेस मुदतवाढ दिली आहे. मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अर्ज भरण्याची मुदत संपण्याच्या एक दिवस आधी ७१ दुकानांसाठी केवळ ५५ अर्ज आले होते. हा प्रतिसाद अत्यंत कमी असल्याने मुदतवाढ देण्याची नामुष्की मंडळावर ओढवली आहे.
आता इच्छुकांन नोंदणी व अर्ज सादर करण्यासाठी १० ऑक्टोबरपर्यंत मुदत असणार आहे. १५ ऑक्टोबर रोजी अर्जदारांना बोली लावता येणार असून १६ ऑक्टोबर रोजी ई लिलावाचा निकाल जाहीर होणार आहे. या मुदतवाढीत तरी दुकानांना प्रतिसाद मिळतो का हे पाहणे महत्त्वाचे आहे.