अस्वच्छता, काँक्रिटीकरण, विसर्जन कारणीभूत; पिण्यासाठी अयोग्य, जैवविविधतेला धोका

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नमिता धुरी, लोकसत्ता

मुंबई : मानवी वस्त्यांमधून येणारे सांडपाणी, कचरा, भोवतालच्या परिसरात झालेले काँक्रिटीकरण, इत्यादी कारणांमुळे सध्या मुंबई आणि परिसरातील तलावांची दुरवस्था झाली आहे. काही मोजके  तलाव वगळता इतर तलावांच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी होत नाही. परंतु पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या नैसर्गिक जलस्रोतातील जैवविविधता धोक्यात आली आहे.

मुंबईच्या पवई तलावात १७ इनलेट्समधून सांडपाणी सोडले जाते. त्यामुळे गणेशघाटाजवळचा परिसर आणि उत्तरेकडचा भाग सर्वाधिक प्रदूषित आहे. गणेश विसर्जन के ल्यानंतर प्लास्टर ऑफ पॅरिस तळाशी साचून राहिल्याने तलावाची खोली घटून जलधारण क्षमता कमी झाली आहे. सूर्यप्रकाश पाण्यात किती खोलवर पोहोचतो यावरून पाण्याची पारदर्शकता मोजली जाते. १९८९मध्ये पवई तलावाची पारदर्शकता १२० सेंटिमीटर होती. २००२मध्ये ती १०० सेंटिमीटपर्यंत कमी झाली. आता के वळ १९ ते २० सेंटिमीटर पारदर्शकता उरली आहे, अशी माहिती या तलावाचा अभ्यास करणारे तज्ज्ञ डॉ. प्रमोद साळसकर यांनी दिली. तसेच भोवताली विकासकामे झाल्याने येथील जमिनीचे काँक्रिटीकरण झाले असून जमिनीवर पडलेले पावसाचे पाणी खाली मुरून तलावात झिरपण्याचे प्रमाण कमी झाल्याचेही त्यांनी सांगितले.

चारकोप सेक्टर ८ मधील तलावाच्या परिसरात घुबड, बुलबुल, रॉबिन इत्यादी ५५ प्रजातींचे पक्षी येत होते. कचऱ्यामुळे अस्वच्छ झालेल्या पाण्याकडे पक्ष्यांनी पाठ फिरवली आहे. टाळेबंदीपूर्वी विविध स्वयंसेवी संस्थांनी १०५ दिवस मेहनत करून हा तलाव स्वच्छ के ला, मात्र त्यानंतर पुन्हा येथे कचरा टाकणे सुरूच राहिल्याची माहिती येथे पर्यावरण कार्यकर्ती मिली शेट्टी यांनी दिली.

पालघरमधल्या टेंबोडा येथील गणेशकुं ड तलावात पूर्वी वर्षभर पाणी असे. भोवताली झालेली बांधकामे आणि गणेश विसर्जन यांचा गाळ तलावाच्या तळाशी साचून राहतो. त्यामुळे जमिनीत पाणी मुरत नाही व भूजल पातळी घटते.बोईसर येथील पंचाळी गावातील तलावात विसर्जनासाठी पायऱ्या बांधण्यात आल्याने गावातील पावसाचे पाणी तलावात येण्याचा मार्ग बंद झाला आहे. अनेक ठिकाणी तलावांच्या भिंतींना सिमेंटने लेपले जाते. त्यामुळे तलावांना टाकीचे स्वरूप आले आहे.

लोखंडवाला तलावाबाबत चिंता

‘लोखंडवाला-ओशिवरा रहिवासी संघटने’चे धवल शाह यांनी अंधेरीच्या लोखंडवाला तलावाबाबत चिंता व्यक्त के ली. गणेशोत्सवानंतर विक्री न झालेल्या शिल्लक मूर्तीचे विसर्जन या तलावात के ले जात असल्याचे शाह यांचे म्हणणे आहे. तलावातील मासे जलपर्णी व किडे खातात. त्यामुळे येथे चालणाऱ्या अनधिकृत मासेमारीचा परिणाम तलावाच्या स्वच्छतेवर होत असल्याचे त्यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lakes existence in the mumbai area is in danger zws
First published on: 03-07-2021 at 11:11 IST